संजय राऊतांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट ईडीकडून जप्त!


मुंबई – ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर याआधी ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली आहे. ईडीकडून संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपकडून संजय राऊतांना लक्ष्य केले जात आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने यासंदर्भात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी यावर बोलताना भाजपवर प्रतिहल्ला चढवला आहे. कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिले की मालमत्ता जप्त केली. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता घेतली असेल, तर सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.