हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावण्यास पुणे शहराध्यक्षांचा नकार


पुणे – गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेमुळे पक्षालाच फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. याच कारणामुळे मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नसल्याचे मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले आहे. पण त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचे म्हटले आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर आपण नेमकी काय भूमिका घ्यावी याबद्दल फार संभ्रमात असल्याचेही मोरेंनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढलीय का असा प्रश्न वसंत मोरेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, मी एक क्लिअर करतो की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाही. पण राजसाहेबांचे भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलेच नसल्याचे सांगितलं. पुढे बोलताना मोरे यांनी, जो शब्द राज ठाकरेंनी वापरला तो, जर मशीदींवरील भोंगे काढले नाही तर.. असा होता. स्टेजवर मी देखील होतो, मी भाषण ऐकले आहे. तर भोंगे कुणी काढायचे आहेत. तर ते भोंगे सरकारने काढायचे आहेत. सरकारने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचे वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितले आहे.

वसंत मोरे यांना त्यांच्या तसेच साईनाथ बाबर यांच्या वॉर्डमध्ये स्थानिक पातळीवर भोंग्यांविरोधातील भूमिका ही पक्षाच्या विरोधात जाणारी ठरु शकते, असे वाटते असल्याचेही म्हटले आहे. आमची ही भूमिका वादग्रस्त भूमिका ठरु शकते. त्याचा परिणाम लोकप्रितिनीधी म्हणून निवडून येताना होऊ शकतो. मी झालो, साईनाथ झाला. साईनाथच्या वॉर्डात ७० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आम्ही त्यांच्यात जाऊन असंख्य कामे केलेली आहेत. राज ठाकरेंची भूमिका चुकीची नाही. मला भूमिकेबाबतीत नाही, तर कार्यकर्त्यांनी थोडे शांततेने घेतले पाहिजे असे वाटत असल्याचे स्पष्ट मत मोरे यांनी व्यक्त केले आहे.

रमजानचा माहिना सुरु आहे. या दिवसांमध्ये पोलीस १४९ कलम लगेच लावतात. पोलिसांनी मला बोलवून विचारले होते की काय भूमिका घेणार आहात का? मला काय भूमिका घेऊ हेच कळले नसल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे त्यांनी, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही म्हटल आहे. माझा आणि साईनाथचा संपर्क झाला नाही. साईनाथला फोन आले असतील. मला फोन आले. काल एक गट मला येऊन भेटला. त्यांनी मला विचारले असे काही आहे का? तर त्यावर मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागामध्ये शांततता कशी राहील हेच पाहील. त्या भूमिकेसाठी मी ठाम असल्याचे मोरे यांनी थेटपणे सांगितले आहे.