पुण्यातील ही ठिकाणे झपाटलेली !

shaniwarwada
भूता-खेतांच्या कथा, काही लोकांना प्रत्यक्षात आलेले विचित्र अनुभव, किंवा काही तथाकथित ‘झपाटलेल्या’ ठिकाणांच्या विषयी अनेक घटना, कथा आपल्या कानी नेहमीच पडत असतात. मात्र या गोष्टींवर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. अश्या घटनांच्या किंवा ठिकाणांच्या बद्दल जाणून घेतल्यानंतर काहींच्या जीवाचा थरकाप उडतो, तर या ठिकाणी खरोखर नकारात्मक शक्ती असतील का हे जाणून घेण्याची उत्सुकता काहींच्या मनामध्ये जागी होते. भारतामध्ये तथाकथित झपाटलेली ठिकाणे अनेक आहेत. यामध्ये समावेश आहे,  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराचा. पुण्यातही अशी अनेक ठिकाणे आहेत, जी झपाटलेली असल्याचे म्हटले जाते. ही ठिकाणे कोणती ते जाणून घेऊ या.  या माहितीचा उद्देश कोणत्याही अफवांना थारा देण्याचा नसून, केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने ही माहिती दिलेली आहे.
sinhagad
एके काळी पेशव्यांचे औपचारिक निवास स्थान असलेला शनिवारवाडा आजही पुण्यात मोठ्या दिमाखाने उभा आहे. मात्र या ठिकाणी अनेकांना विचित्र अनुभव आले असल्याचे म्हटले जाते. माधवराव पेशव्यांच्या मृत्युनंतर त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव यांची शनिवारवाड्यामध्ये हत्या करण्यात आली. संकटाच्या काळी नारायणरावांनी ‘काका, मला वाचवा’ असे म्हणत त्यांच्या काकांना मदतीसाठी मारलेली हाक पौर्णिमेच्या रात्री आजही येथे ऐकू येत असल्याचे म्हटले जाते. शनिवार वाडा आता सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुला असला, तरी संध्याकाळी सहाच्या नंतर येथे प्रवेश नाही. अनेक हौशी मंडळींनी या वास्तूमध्ये खरेच कुठले आवाज येतात किंवा नाही हे शोधून काढण्याचा प्रयत्नही केला असून, त्यातून कोणतेच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा वाडा खरेच झपाटलेला आहे किंवा नाही हे गूढच म्हणावे लागेल.
holkar
पुण्यातील चंदननगर भागातील एका विवक्षित रस्त्यावर दररोज मध्यरात्रीच्या वेळी हातामध्ये बाहुली घेतलेली एक लहान मुलगी दृष्टीस पडत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. एका घराचे बांधकाम सुरु असताना या मुलीचा अपघाती मृत्यू त्या ठिकाणी झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे या रस्त्याने संध्याकाळनंतर फारशी वर्दळ पहावयास मिळत नसल्याचे समजते. त्याचप्रमाणे पुण्यातील होळकर पुलावरून जाताना रात्रीच्या वेळी लोकांना अनेक विचित्र अनुभव आल्याचे म्हटले जाते. सुट्टीच्या दिवशी आणि विशेषकरून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुणेकरांचे आवडते सहलीचे ठिकाण म्हणजे सिंहगड. मात्र या ठिकाणी देखील रात्रीच्या वेळी अनेक चित्र विचित्र आवाज ऐकू येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment