फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी योग उपयुक्त

cancer
फुफ्फुसाचा कर्करोग हा जगामध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. केवळ २०१८ या एकाच वर्षामध्ये जगभरामध्ये २,०९३,००० रुग्णांना फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निश्चित निदान केले गेले. वास्तविक हा रोग महिलांच्या मानाने पुरुषांमध्ये अधिक आढळून येत असे. पण सध्याच्या काळामध्ये वाढते प्रदूषण, बदललेल्या जीवनशैली यांमुळे हा रोग आता महिलांमध्येही आढळून येऊ लागला आहे. फुफुफ्साच्या कर्करोगाचे चार प्रकार असून, यामध्ये ‘अडेनोकार्सीनोमा’ आणि ‘स्क्वामस सेल कार्सीनोमा’ हे दोन प्रकार जास्त आढळून येणारे आहेत. सध्याच्या प्रगत काळामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग योग्य उपचार करून बरा होण्यातला असला, तरी मुळात या कर्करोगाचे निदान वेळेवर होणे अत्यावश्यक असते. या रोगाची अनेक लक्षणे असून, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत खोकला येणे, हात, आणि बगलांमध्ये वेदना, मान आणि पाठदुखी, दम लागणे, अचानक वजन जलद घटू लागणे, थुंकीतून रक्त पडणे आणि सतत सुस्ती जाणविणे ही या रोगाची काही प्रमुख लक्षणे आहेत.
cancer1
या रोगावर निश्चित उपचार शोधीत असतानाच, सामन्य ‘अॅलोपथीक’ उपचार पद्धतीच्या जोडीनेच वैद्यकीय तज्ञ इतर उपचार पद्धतींकडेही पाहत आहेत. या पद्धतींमध्येच योगसाधना फुफ्फुसाच्या कर्करोगावर अतिशय प्रभावी उपाय असल्याचे दिसून आले आहे. या संबंधी रिसर्च अमेरिकेमध्ये सुरु असून, नॅशनल इंस्टीटयूट ऑफ हेल्थ येथील २६ रुग्णांवर केमोथेरपी आणि इतर उपचारांच्या सोबतच योगसाधने द्वारेही यशस्वी उपचार करण्यात येत आहेत. या सर्व रुग्णांवर योगसाधनेचा प्रभाव इतका चांगला झाला, की कर्करोगातून पूर्ण बरे झाल्यानंतरही आता यातील अनेक रुग्णांनी योगसाधनेचा अवलंब त्यांच्या जीवनशैलीमध्ये कायमस्वरूपी केला असल्याचे समजते.
cancer2
योगसाधनेमुळे शरीर तणावरहित होत असून, जे रुग्ण केमोथेरपी किंवा रेडियेशन थेरपी सारखे उपचार घेत होते, त्यांच्यासाठी योगसाधना विशेष फायद्याची ठरली आहे. तसेच या रुग्णांच्या वैयक्तिक शारीरिक क्षमता आणि आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार योगासने त्यांना शिकविली गेल्याने त्याचा या रुग्णांना विशेष लाभ झाल्याचे पहावयास मिळत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment