अशी घ्या आपल्या लोकरी कपड्यांची काळजी

woolen
आपण वापरत असलेल्या निरनिराळ्या कपड्यांची काळजी आपण निरनिरळ्या प्रकारे घेत असतो. सुती कपडे धुण्याची पद्धत वेगळी असून, तीच पद्धत नाजूक, रेशमी कपड्यांना लागू पडत नाही. लेदर जॅकेट्स किंवा डाऊन जॅकेट्स साफ करण्याची पद्धत वेगळी असून, ही पद्धत इतर कपड्यांना लागू पडत नाही. त्याचप्रमाणे लोकरी कपडेही धुण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची पद्धत वेगळी असते. थंडीच्या मोसामाखेरीज हे कपडे वापरले जात नाहीत. त्यामुळे या कपड्यांची काळ्जी व्यवस्थित घेतली गेली, तर हे कपडे वर्षानुवर्षे चांगले राहू शकतात.
woolen1
लोकरीचे कपडे नाजूक असतात. त्यामुळे ते धुताना, वाळविताना आणि उपयोगात नसताना ते कपाटामध्ये व्यवस्थित ठेवले जातील याची काळजी घेणे आवश्यक असते. काही लोक आपले लोकरी कपडे ड्राय क्लीन करून घेणेच पसंत करतात. यामध्ये भरमसाट पैसेही खर्च होत असतात. पण खरेतर आपण थोडा वेळ देऊन हे कपडे काळजीपूर्वक घरीच धुतले तर पैश्यांची बचत होते आणि कपडे देखील ड्राय क्लीन करून आणल्याप्रमाणे स्वच्छ, चमकदार दिसतात. आपल्या लोकरी कपड्यांवर असलेल्या लेबलवर बहुतेकवेळी हे कपडे कसे धुतले जावेत यासंबंधी सूचन दिलेल्या असतात. जर एखाद्या कपड्यावर ‘ड्राय क्लीन ओन्ली’ असे लेबल असेल, तर हा कपडा घरी न धुता ड्राय क्लीनच करवून घ्यावा. जर असा कपडा घरी धुतला, तर त्याचा रंग जाण्याचा, किंवा तो आटण्याचा, त्याचा आकार वेडावाकडा होण्याचा संभव असतो. त्यामुळे एखादा चांगला ड्राय क्लीनर पाहून त्याच्याकडूनच हे कपडे ड्राय क्लीन करवून घ्यावेत. तसेच कपडे ड्राय क्लीन होऊन आल्यानंतर ते पिशवीतून लगेच बाहेर काढून कपाटामध्ये ठेवावेत.
लोकरीचा कपडा घरी धुण्यापूर्वी तो कुठून उसविला नसल्याची खात्री करून घ्यावी. जर कपडा उसविला असेल, तर तो तिथे दुरुस्त करून घेऊन मगच धुवावा. आजकालच्या वॉशिंग मशीन्समध्ये लोकरीचे कपडे धुण्याकरिता वेगळी ‘सायकल’ असते. या प्रक्रियेदरम्यान लोकरीचे कपडे मशीनमध्ये हळुवार धुतले जाऊन जास्त पिळलेही जात नाहीत. पण अश्या प्रकारची खास ‘वॉश सायकल’ आपल्या वॉसिंग मशीनमध्ये नसल्यास लोकरीचे कपडे त्यामध्ये न धुणे चांगले. वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतल्याने त्यांचा आकार बिघडू शकतो, त्यांची चमक नाहीशी होऊ शकते, रंग फिके पडू शकतात आणि कपडे आटू शकतात.
woolen2
लोकरीचे कपडे धुताना शक्यतो हातानेच धुवावेत. गडद रंगांचे कपडे हलक्या रंगांच्या कपड्यांच्या सोबत भिजवू नयेत. तेसेच हे कपडे धुण्यासाठी बाजारामध्ये खास लिक्विड मिळते त्याचाच वापर करावा. हे लिक्विड उपलब्ध नसल्यास एखाद्या सौम्य शँपूचा वापर करावा. हे कपडे धुण्याआधी केवळ पाच ते दहा मिनिटे भिजवावेत. तसेच हे कपडे भिजविण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्यामुळे कपड्याचे रंग फिकट होऊन कपडा आटू शकतो. लोकरीचे कपडे नाजूक असून, ते लगेच स्वच्छ होणारेही असतात, त्यामुळे ही कपडे घासून धुण्याची आवश्यकता नसते. थंड पाण्यामध्ये लिक्विड सोप मिसळून यामध्ये काही मिनिटे कपडे भिजविल्यानेही हे कपडे स्वच्छ होतात. हे कपडे धुण्यासाठी सामान्य डीटर्जंटचा वापर करू नये.
woolen3
कपडे धुवून झाल्यानंतर हे कपडे तारेवर किंवा स्टँडवर वाळत न घालता एखाद्या टेबलावर पसरवून वाळू द्यावेत. त्यामुळे या कपड्यांचा आकार बिघडण्याची शक्यता टाळता येते. तसेच कडक उन्हामध्ये हे कपडे वाळविणे टाळावे. कपडे व्यवस्थित वाळल्यानंतरच त्यांच्या घड्या कराव्यात. या कपड्यांना इस्त्री करायची झाल्यास इस्त्रीवरील खास लोकरीच्या कपड्यांसाठी असलेल्या सेटिंगवरच इस्त्री करावी. हे कपडे वापरात नसताना कपाटामध्ये एखाद्या साडी कव्हरमध्ये घालून, त्यामध्ये डांबराच्या गोळ्या घालून ठेवावेत. अधून मधून या कपड्यांना काही मिनिटे ऊन दाखविल्याने या कपड्यांना दुर्गंधी येणार नाही.

Leave a Comment