पारिजातक आणि त्याच्याशी निगडित प्राचीन मान्यता

jasmin
पारिजातक किंवा ‘हरीशृंगार’ हा दिव्य वृक्ष समजला जातो. या वृक्षाला येणारी फुले अतिशय नाजूक, सुंदर आणि सुगंधी असतात. पारिजातकाचा वृक्ष दहा ते पंधरा फुटांच्या उंचीपर्यंत वाढू शकतो. हिंदू धर्मामध्ये या वृक्षाला महत्वाचे स्थान आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार या वृक्षाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती. त्यांनतर इंद्रदेवाने त्यांच्या महालाच्या वाटिकेमध्ये हा वृक्ष लावला. हरिवंशपुराणानुसार या वृक्षाला स्पर्श करताच देव- नर्तकी उर्वशीचा सर्व थकवा दूर होत असल्याचे उल्लेख आहेत. श्री हरींच्या पूजेसाठी या फुलांचा वापर होत असल्याने या वृक्षाला ‘हरीशृंगार’ या नावाने ओळखले जात असून, हा दिव्य वृक्ष इच्छापूर्ती करणारा असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो.
jasmin1
आणखी एक पौराणिक कथा अशी, की एकदा देवर्षी नारदमुनींनी इंद्रदेवांच्या महालातील बगीच्यामध्ये उभ्या असलेल्या पारिजातकाची काही फुले तोडून भगवान कृष्णाकडे आणली. कृष्णाने ही फुले रुक्मीणीला दिली. इतकी सुंदर फुले कृष्णाने रुक्मीणीला दिलेली पाहून सत्यभामेला राग अनावर झाला, आणि ही सुंदर फुले ज्या वृक्षाची आहेत, तो वृक्षच आपल्याला हवा असा हट्ट तिने कृष्णाजवळ धरला असल्याची कथा प्रचलित आहे. त्यांनतर सत्यभामेचा हट्ट पुरविण्यासाठी श्रीकृष्णाने हा स्वर्गीचा वृक्ष पृथ्वीवर आणला असता, इंद्रदेवांनी क्रोधीत होऊन शाप दिला. या वृक्षाची फुले कधीही दिवसा उमलणार नाहीत आणि उमललेली फुले थोड्याच अवधीमध्ये कोमेजून जातील असा हा शाप होता, अशी ही पौराणिक मान्यता आहे.
jasmin2
या वृक्षाशी निगडित आणखी एक कथा अशी, की पारिजात नामक एका राजकुमारीचे सूर्यदेवांवर प्रेम जडले. पण सूर्यदेवाने पारिजातच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. त्यामुळे नैराश्य येऊन पारिजातने प्राणत्याग केला. ज्या ठिकाणी पारिजातने देहत्याग केला, त्याच ठिकाणी हा वृक्ष जन्माला आल्याचे म्हटले जाते. या वृक्षाचा उल्लेख महाभारतामध्येही सापडतो. पांडव जेव्हा कुंतीसोबत अज्ञातवासामध्ये होते, तेव्हा सत्यभामेच्या वाटिकेमध्ये उमललेला पारिजातक त्यांनी पाहिला. हा वृक्ष आपल्याकडे ही असावा या इच्छेने त्यांनी या वृक्षाची फांदी, त्यांचा निवास असलेल्या गावामध्ये लावली. आजच्या काळामध्ये हे गाव उत्तरप्रदेशातील बोरोलीया नामक गाव असून, आजही हा वृक्ष येथे अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे.
jasmin3
धनाची देवी महालक्ष्मीला पारिजातक प्रिय आहे. लक्ष्मी प्रसन्न असावी या करीता घराच्या आसपास पारिजातकाचा वृक्ष आवर्जून लावला जात असतो. तसेच दिवाळी, होळी, ग्रहण, गुरुपुष्य अश्या काही निमित्ताने केली गेलेली पारिजातकाची पूजा उत्तम फल देणारी असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment