लांबसडक, कोंडाविरहित केसांसाठी आणि नितळ त्वचेकरिता आजमावा ‘अॅलोव्हेरा’ तेल.

aleo
वाढते प्रदूषण, शारीरिक किंवा मानसिक तणाव, असंतुलित भोजन, हार्मोन्समध्ये निर्माण झालेले असंतुलन या सर्व गोष्टींचा थेट परिणाम त्वचा आणि केसांवर प्रामुख्याने पाहायला मिळतो. या सर्व समस्यांसाठी जीवनशैलीमध्ये योग्य परिवर्तन हा एकमेव उपाय असला तरी केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्याकारीता काही बाह्य-उपाययोजना करणेही आवश्यक असते. अनेकदा घरगुती उपायांनी देखील केसांच्या किंवा त्वचेशी निगडित समस्यांवर नियंत्रण मिळविता येते. केस लांबसडक, कोंडा विरहित आणि निरोगी असावेत या करिता अॅलो व्हेराचा वापर करून बनविले गेलेले तेल खूप उपयोगी पडू शकते. हे तेल त्वचेसाठी देखील चांगले आहे.
aleo1
हे तेल निरनिराळ्या प्रकारे तयार करता येऊ शकते. यातील प्रथम पद्धत आहे ‘हीटेड मेथड’. यामध्ये अॅलो व्हेरा स्वच्छ धुवून घेऊन लहान लहान तुकडे करून घेऊन ते मिक्सरवर बारीक वाटावेत. त्यानंतर वाटलेले अॅलो व्हेरा एका भांड्यामध्ये काढून घेऊन या गराचे प्रमाण जितके असेल, तितक्याच प्रमाणामध्ये ऑलिव्ह ऑइल यामध्ये मिसळावे. हे मिश्रण मध्यम आचेवर शिजत ठेऊन सतत ढवळत राहवे. ज्याप्रमाणे तूप कढवताना ते तयार झाल्यावर सोनेरी रंगाची बेरी तुपावर तरंगू लागते, तश्याच प्रकारचा रंग या मिश्रणातील अॅलो व्हेराच्या गराला येतो. अॅलो व्हेराचा गर सोनेरी झाल्यानंतर एका बरणीमध्ये हे मिश्रण गाळून घ्यावे आणि या तेलाने केसांना व त्वचेला मालिश करावी.
aleo2
हे तेल बनविण्याची अजून एक पद्धत अशी, की अॅलो व्हेराचे बारीक तुकडे करून घेऊन ते एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यावेत. त्यानंतर या तुकड्यांवर खोबरेल तेल घालावे. अॅलो व्हेराचे सर्व तुकडे तेलामध्ये बुडून तेल वर येईल इतपत बरणीमध्ये ओतावे. त्यानंतर ही बरणी घट्ट बंद करून हे तुकडे महिनाभर तेलामध्ये मुरण्यास ठेवावेत. साधारण एक महिन्यानंतर हे तेल वापरण्यास तयार होईल. या तेलामध्ये अॅलो व्हेराच्या तुकड्यांच्या ऐवजी केवळ अॅलोव्हेरामधून काढून घेतलेल्या गराचा वापरही करता येईल. अॅलो व्हेराची पाने कापून घेऊन त्यातून गर खरवडून काढावा, व हलक्या हाताने हा गर थोडासा फेटून घ्यावा. त्यानंतर हा गर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेऊन त्यावर येईल इतपत खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल त्यामध्ये घालून हे तेलही काही दिवस मुरवत ठेवावे. हे तेल त्वचा आणि केसांसाठी अतिशय पोषक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment