स्मृती इराणी यांच्या ‘फॅट टू फिट’ दर्शनाने लोक आश्चर्यचकित

करोना काळात वर्क फ्रॉम होम कल्चर फोफावले आणि त्यामुळे अनेकांची वजने प्रमाणाबाहेर वाढली असे दिसून आले. आता वाढलेली वजने उतरवायची कशी यासाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत. वाढलेले वजन माणसाला बेढब बनवितेच पण त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. विशेष म्हणजे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र करोना काळात स्वतःला ‘फॅट टू फिट’ बनविले असून त्यांचे अनेक फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहेत. स्मृती इराणी यांनी वजन उतरविण्यासाठी काय केले याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्मृती यांनी ‘नो डेअरी, नो ग्लुटेन’ आहार पद्धतीने हा आश्चर्यकारक बदल स्वतःमध्ये घडविला असल्याचे सांगितले जात आहे.

बॉलीवूड कलाकार मनीष पॉल याने स्मृती इराणी यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. त्या खाली तो लिहितो,’ मॅडम, तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही छान स्वागत केलेत पण चहा ऐवजी काढा दिलात.’ आहारतज्ञ सांगतात, ग्लुटेन हे एक प्रकारचे प्रोटीन असून अनेक धान्यात ते असते. त्याचा खास लाभ शरीराला होत नाही पण त्यामुळे वजन वाढते. दुध आणि दुग्ध पदार्थ प्रोटीन आणि अन्य पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत पण त्यात फॅट मुबलक प्रमाणात असते त्यामुळे वजन वाढते. डेअरी आणि ग्लुटेन फ्री आहार घेतल्यास पचन शक्ती सुधारते, उर्जेचा स्तर वाढतो, हार्मोनल क्रिया सुधारतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी आहारातून ग्लुटेन असलेले पदार्थ वर्ज करायला हवेत. गव्हात मोठया प्रमाणावर ग्लुटेन आहे. त्यामुळे ब्रेड, केक, कुकीज, कॅन्डीज टाळल्या तर वजन कमी होऊ शकते.