या रुग्णांमध्ये हमखास आढळते ड जीवनसत्वाची कमतरता


अलीकडेच शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आणि उच्चरक्तदाब व डायबेटीस-टाईप २ हे विकार एकमेकांशी फारच जवळून संबंधित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ड जीवनसत्व शरीरामधे कमी असले, तर केवळ हाडे ठिसूळ होतात हा समज चुकीचा असून, या जीवनसत्वाच्या अभावाने इतरही विकार उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाल्याचे या संशोधनामध्ये म्हटले आहे. ड जीवन सत्व ‘सनशाईन व्हिटॅमिन’ म्हणूनही ओळखले जाते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने त्वचेमार्फत या जीवनसत्वाची निर्मिती केली जाते. हे जीवनसत्व शरीरासाठी अतिशय आवश्यक असून, त्याद्वारे हाडांच्या, दातांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक कॅल्शियम आणि फॉस्फोरसची मात्रा नियंत्रित केली जात असते.

या संशोधनाच्या अनुसार भारतातील सुमारे ८४.२ टक्के मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, तसेच ८२.६ टक्के उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आढळून आली आहे. आता या रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाची मात्रा वाढविल्यानंतर त्याचा परिणाम या विकारांवर कश्या प्रकारे होतो हे पाहणेही आवश्यक ठरणार असल्याचे संशोधनामध्ये म्हटले आहे. मात्र केवळ ड जीवनसत्वाच्या मात्रेमध्ये वाढ करून हे विकार संपूर्ण बरे होणार नसून, या विकारांसाठी अवलंबल्या जाणाऱ्या उपचारपद्धतींच्या सोबत ड जीवनसत्वामध्ये वाढ केली जाणे अधिक उपयुक्त ठरणार असल्याचेही या संशोधनामध्ये म्हटले आहे.

मात्र एखाद्या रुग्णाला स्नायू किंवा हाडांशी निगडित काही विकार असतील, तर मात्र त्या व्यक्तीच्या बाबतीत ड जीवनसत्व अधिक मात्रेमध्ये पुरविले जाणे आवश्यक असल्याचेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता निरनिराळ्या कारणांमुळे उद्भवते. यामध्ये कोवळ्या उन्हाचा संपर्क नसणे, हवेतील अतिप्रदुषणामुळे होत असलेले अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे उत्सर्जन, व त्यामुळे त्वचेच्या मार्फत ड जीवनसत्व न निर्माण केले जाणे, त्वचा काळवंडू नये म्हणून उन्हामध्ये जाणे टाळणे, या आणि अश्या अनेक कारणांमुळे त्वचेमध्ये ड जीवनसत्व तयार होऊ शकत नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी कोवळ्या उन्हाचा त्वचेशी संपर्क आवश्यक आहेच, पण त्याशिवाय आहारामध्ये कॉड लिव्हर ऑईल, साल्मन, मॅकरेल मासे, अंड्याचे पिवळे बलक, मशरुम्स इत्यादी पदार्थ असण्यानेही फायदा होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment