रिकाम्या पोटी हे अन्नपदार्थ खाणे टाळा


आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये पोषक आणि ताजे अन्नपदार्थ असणे आवश्यक आहे. आहारामध्ये केवळ उत्तम प्रतीचे आणि पौष्टिक पदार्थ असणे आवश्यक असले, तरी हे पदार्थ दिवसभरामध्ये कधी खाल्ले जावेत, कसे खाल्ले जावेत याचा विचार होणेही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीची विशेषता ही आहे, की कोणता पदार्थ कोणत्या ऋतूमध्ये खाल्ला जावा इतकेच नाही, तर कोणत्या वेळी खाल्ला जावा या बद्द्लही काही निश्चित नियम आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आले आहेत.

प्राचीन काळी लोक या नियमांचे पालनही अतिशय काटेकोरपणे करीत असत. पण काळ बदलला तश्या लोकांच्या खाण्या-पिण्याच्या आवडी बदलल्या, धावत्या जीवनशैलीमुळे भोजनाचे वेळापत्रकही बिघडले, आणि हेच निमित्त निरनिरळ्या आजारांसाठी आमंत्रण ठरले. त्यामुळे उत्तम प्रतीचा पोषक आहार घेऊनही त्याचा म्हणावा तसा फायदा होताना पहावयास मिळेनासा झाला. म्हणूनच दैनंदिन आहाराचा विचार करीत असताना कोणते अन्नपदार्थ कधी खाल्ले जावेत याचा विचार करणे महत्वाचे ठरते.

सध्या श्रावण महिन्यामध्ये अनेक उपवास असल्याने रताळी आहारामध्ये आवर्जून समाविष्ट केली जातात. रताळी आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असली, तरी यांचे सेवन सकाळी उठल्याबरोबर, रिकाम्या पोटी करू नये. रताळ्यामध्ये टॅनीन आणि पेक्टिन ही दोन तत्वे असल्याने रिकाम्या पोटी ही तत्वे खाल्ली गेल्यास अपचन आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

तसेच छातीत जळजळ होण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. रताळ्याप्रमाणेच कच्चे टोमॅटो देखील आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. मात्र हे रिकम्या पोटी सेवन केले गेल्यास यामध्ये असलेली आम्ले पोटातील रसायनांच्या सोबत मिसळून त्यामुळे पित्ताची समस्या उद्भवू शकते. सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणेही पित्ताला निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक ठरते.

या पाण्यामध्ये मध, लिंबाचा रस किंवा अॅपल सायडर व्हिनेगर घालून त्याचे सेवन केल्याने पोटातील सर्व अवयव सक्रीय होतात, मलावरोध दूर होतो आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने चहा किंवा कॉफीचे सेवन करणे चांगले. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी सोडा युक्त पेये पिणे ही अयोग्य असून, त्यायोगे पोटदुखी, छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment