समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे धक्कादायक खुलासे


मुंबई – एनसीबीने मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप आणि दावे केले आहेत. खोटी कागदपत्रे दाखवत समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि निकाहनामा समोर आणत ते मुस्लीम असल्याचेही म्हटल्यानंतर समीर वानखेडे यांच्या धर्मासंबंधी चर्चा सुरु असून आता त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनीही एबीपी माझाशी बोलताना काही खुलासे केले आहेत.

एबीपी माझाशी बोलताना समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी सांगितले की, हे लव्ह मॅरेज नसून ठरवून कऱण्यात आलेले लग्न होते. चार-पाच वर्षांपासून एकमेकांना आमची कुटुंबे ओळखत होती. ते मुस्लीम असल्याचे माहिती होते. हिंदू आहेत माहिती असते, तर लग्नच केले नसते. यांचे संपूर्ण कुटुंब मुस्लीम आहे. आमच्याकडे आले तेव्हाही ते मुस्लीम म्हणूनच आले होते. हिंदू म्हणून कधी आले नव्हते. आत्ता आम्हाला माध्यमांकडून ते हिंदू असल्याचे कळाले. तेव्हा युपीएससीसाठी समीर वानखेडे अभ्यास करत होते, असेही त्यांनी सांगितले.

तलाक झाला असल्यामुळे आम्ही आमचे दु:ख पचवले होते. कधी कोणाला आम्ही एक्स्पोज केले नव्हते. आम्ही सगळे दु:ख विसरलो होतो, असेही त्यांनी सांगितले. मुस्लीम पद्धतीने सर्व गोष्टी त्यांची आई करत होत्या, असेही यावेळी ते म्हणाले. जेव्हा झायदा यांच्याशी लग्न झाले, तेव्हा समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला. मुस्लीम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न झाले नसते. ते आधीचे कागदपत्रं दाखवत आहेत. लग्नानंतरचे दाखवत नाहीत. झायदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर ते दाऊद झाले. ते आधी हिंदू होते का याबद्दल माहिती नाही. पण जेव्हा लग्न केले, तेव्हा दाऊद मुस्लिमच होते, असा खुलासा त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्या घऱातही मुस्लीम प्रथा पाळली जात होती, असेही त्यांनी सांगितले.