राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे समीर वानखेडेंना अटकेच्या तीन दिवस आधी नोटीस देण्याचे आदेश


मुंबई – एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. समीर आणि त्यांच्या कुटुंबावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विविध आरोप केले आहेत. चार तक्रारी देखील त्यांच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयने करण्याची आणि कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने समीर वानखेडेंना तुर्तास दिलासा दिला आहे. तसेच समीर वानखेडे यांना अटक करताना ३ दिवसाआधी नोटीस देण्याचा आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

वानखेडे यांना अटक करायची झाल्यास तीन दिवसांपुर्वी नोटीस दिली जाईल, अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली. आम्ही सध्या केवळ के पी गोसावीविरोधात तपास करत आहोत. तपासात पुढे काय येणार माहीत नाही. वानखेडे यांनी भीतीपोटी याचिका केल्याचा दावा सरकारने न्यायालयात केला. चार तक्रारी समीर वानखेडे यांच्याविरोधात दाखल आहेत. त्यामुळे राज्य सरकार आपल्या विरोधात कारवाई करु शकते, या भीतीपोटी वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण वानखेडेंच्या याचिकेला राज्य सरकारने न्यायालयात विरोध केला.

दरम्यान वानखेडे यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच दाखल तक्रारीमध्ये तथ्य असल्यास वानखेडे यांच्याविरोधात अटकेची कारवाई करायची असल्यास त्यांना ३ दिवसा आधी नोटीस द्या, असा आदेश सुद्धा न्यायालयाने दिला आहे.