‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ला विरोध करणाऱ्या क्विंटन डी कॉकचा माफीनामा; आता गुडघ्यावर बसण्यास तयार


दुबई – ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवत गुडघा टेकून बसण्यास दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील खेळाडू क्विंटन डी कॉकने नकार दिला. त्याने यासाठी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील विंडीजविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली. पण त्याने आता याबाबत माफी मागितली आहे. या चांगल्या मोहिमेसाठी यापुढे तो गुडघा टेकवून या मोहिमेला पाठिंबा देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

क्विंटन डी कॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’साठी गुडघा टेकवण्यास नकार दिला आणि याच कारणामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेसाठी गुडघा टेकण्याची बोर्डाची घोषणा आली आणि अचानक डी कॉकने स्वतःला या सामन्यासाठी अनुपलब्ध घोषित केले. नंतर असे वृत्त आले, की डी कॉकने मोहिमेला पाठिंबा न दिल्यामुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.

आता या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच डी कॉकने मौन सोडले आहे. त्याने माफी मागून सुरुवात केली, माझ्या सहकारी खेळाडूंची आणि सर्व चाहत्यांची मी माफी मागतो. मला याला कधीच मोठा मुद्दा बनवायचा नव्हता. मला वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवण्याचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. एक खेळाडू म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे डी कॉकने म्हटले. माझ्या गुडघा टेकण्याने लोकांमध्ये जागरूकता पसरली, तर मी ते आनंदाने करेन. वेस्ट इंडिजविरुद्ध न खेळून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्याबद्दल मी माफी मागतो. बोर्डासोबत माझे भावनिक संभाषण झाले होते. मला वाटते ते आधी घडले असते, तर बरे झाले असते. कारण सामन्याच्या दिवशी हे घडायला नको होते.