काँग्रेस खासदार म्हणतात; दारू, तंबाखूप्रमाणे कर भरुन ड्रग्ज वापरायला परवानगी द्यावी


नवी दिल्ली – देशभरात ड्रग्ज प्रकरण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. त्यानंतर यावरून राजकारणही तापले आहे. दरम्यान, ड्रग्जवर अजब वक्तव्य देशातील ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांनी केले आहे. मादक द्रव्ये जीवनावश्यक असून गुटखा, दारू, तंबाखू यांसारख्या पदार्थांचे सेवन कर भरून केले जात असल्याचे केटीएस तुलसी म्हणाले.

ड्रग्जनाही गुटखा-दारू, सिगारेट यांच्यासारखी सूट देण्यात यावी. ड्रग्ज हे जीवनावश्यक असून त्यामुळे जीवनातील वेदना कमी होतात, त्याचा समतोल वापर केला पाहिजे, असे खासदार केटीएस तुलसी यांनी म्हटले आहे. आयुष्यातील वेदना ड्रग्जमुळे कमी होतात, असे सांगताना तुलसी म्हणाले, दारू, गुटखा, तंबाखूमुळेही हानी होते. पण यांच्यावर कर भरून त्याचे सेवन करू दिले जाते. मग ड्रग्ज का नाही? करवसुली झाल्यानंतर ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे.

ड्रग्जच्या माध्यमातून अनेक प्रसंगी औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे ड्रग्जच्या वापरास परवानगी का देऊ नये? एनडीपीएस कायदा, १९८५ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, कारण त्याचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. वारंवार एनडीपीएस कायद्याचा गैरवापर लोकांना अंमली पदार्थांच्या जास्त किंवा कमी वापराबाबत त्रास देण्यासाठी केला जातो. एनडीपीएस कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे केटीएस तुलसी म्हणाले.