मुंबई – अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात ३ ऑक्टोबरच्या पहाटे या सर्वांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. तिघांनाही या अटकेत घेल्यानंतर २५ दिवसांनी जामीन मिळाला आहे. आर्यन खानची दिवाळी या निर्णयामुळे तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आर्यनला जामीन मिळाल्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तपासावर शंका घेणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आर्यन खानच्या जामीनावर नवाब मलिकांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 28, 2021
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान प्रकरण आणि क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये समीर वानखेडेंच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणाऱ्या नवाब मलिक यांनी फिल्मी स्टाइलमध्ये ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आर्यनला पाचच्या सुमारास जामीन मंजूर झाल्यानंतर मलिक यांनी ५ वाजून १४ मिनिटांनी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असे ट्विट केले आहे.
दरम्यान मलिक यांनी वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा केला आहे. पण हे आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले असून आपण न्यायालयात उत्तर देऊ असे म्हटले आहे. पण असे असतानाच या प्रकरणावरुन आता आमने-सामने आलेले वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून रोज आरोप प्रत्यारोप होतानाचे चित्र दिसत आहे. त्यातच आर्यनला आज जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी केलेल्या ट्विटमधून यापुढेही ते वानखेडेंविरोधातील भूमिका कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आधीच आपण वानखेडेंसंदर्भातील बरीच कागदपत्रे वेळोवेळी पुढे आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.