किरण गोसावीला ८ दिवसांची पोलीस कोठडी


पुणे – सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवरील कारवाईवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली, तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर तो आर्यन खान सोबत सेल्फी काढल्यामुळेही चर्चेत होता. समीर वानखेडेंसोबत क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान असणारा साक्षीदार किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयात किरण गोसावीला हजर केले असता, त्याला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी किरण गोसावीची पोलीस कोठडी मागताना युक्तिवाद केला. त्या म्हणाल्या, २०१८ मध्ये किरण गोसावी विरोधात गुन्हा नोंद आहे. तसेच एप्रिल २०१९ मध्ये चार्जशीट पाठवण्यात आली आहे. किरण गोसावीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हिच्या अकाउंटमध्ये चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते. पण शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता. पैसै परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी देत शिवीगाळ केली होती. त्यानंतर आरोपी किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. गोसावीने यातुन अनेक तरुणांना फसवले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आणखी तपासासाठी किरण गोसावीला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. दरम्यान दोन्ही वकीलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोसावीला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बनावट कागदपत्र तयार करून किरण गोसावी मोबाईल सिम वापरत होता आणि अनेक ठिकाणी मागील काही दिवसात सचिन पाटील नावाने फिरत होता. त्यामुळे हे मोठे जॉब रॉकेट असण्याची शक्यता देखील युक्तिवाद करताना सरकारी वकीलांनी वर्तवली. वकील सचिन कुंभार गोसावीच्या बाजूने म्हणाले, या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीने पैसे घेतले नाहीत. तसेच मोबाईल कोणाच्या नावावर घेतला कोणी घेतला, याची सगळी माहिती पोलिसांना आहे. तसेच अनेक मुद्दे तक्रारदार पक्षाकडून युक्तिवाद करताना मांडण्यात आले आहे. त्यातील एक ही कारण पोलीस कस्टडी मिळावी, यासाठी ग्राह्य धरता येणार नाही.