जामीन मिळाला असला तरी आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच जाणार


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर आज अखेर आर्यन खान आणि त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण, तरीदेखील आज आर्यन खानला तुरुंगातच राहावे लागणार आहे. उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे आर्यन खान उद्या संध्याकाळपर्यंत तुरुंगाबाहेर येऊ शकतो.

याबाबत आर्यन खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत आणि त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट उद्या हाती येणार आहेत. जेल प्रशासनाला ते दिल्यानंतरच आर्यन खानची सुटका होऊ शकणार आहे. आत्ताच जामीन मंजूर झाल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यामुळे ही कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो.

दरम्यान, कोणत्याही आरोपीच्या जामीन अर्जावर निर्णय आला आणि त्या आरोपीला जामीन मंजूर झाला, तर त्यासंदर्भातील न्यायालयाचा आदेश आणि ऑपरेटिव्ह जेलबाहेर लावण्यात आलेल्या पेटीमध्ये टाकावा लागतो. जेलबाहेरच्या या पेट्या रोज सकाळी साधारणपणे ८ वाजता आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उघडतात. आजची ही वेळ गेल्यामुळे आता उद्या सविस्तर निकालाची प्रत आणि कागदपत्र हाती आल्यानंतर ते तुरुंग प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खान बाहेर येऊ शकणार आहे.

आर्यन खानसाठी मुंबई उच्च न्यायालयात माजी केंद्रीय अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडत होते. न्यायालयाच्या निर्देशांनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सविस्तर ऑर्डर उद्या हातात येईल. मला आशा आहे की हे तिघे उद्या किंवा शनिवारपर्यंत बाहेर येतील, असे ते म्हणाले. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्या मिळणार असल्यामुळे उद्याच त्याची तुरुंगातून सुटका होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, प्रतिक्रिया देताना आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी शनिवारचा देखील उल्लेख केला. उद्या कागदपत्रे मिळण्यात किंवा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागला, तर उद्याऐवजी आर्यन खानची सुटका शनिवारपर्यंत लांबू शकते, असे सांगितले जात आहे.