
कराची – पाकिस्तान महिला क्रिकेट महिला संघातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दिली. संघाचे खेळाडू कराचीतील हनिफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने जमले होते. टीममधील सर्व सदस्यांची बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पाकिस्तानी संघाच्या ३ क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण
पण, या खेळाडूंच्या नावांची माहिती पीसीबीने दिलेली नाही, ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना आता १० दिवस कडक आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. पुढील महिन्यात ६ नोव्हेंबर रोजी क्वारंटाइन कालावधी संपेल. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत, टीमच्या उर्वरित सदस्यांना २ नोव्हेंबरपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या खेळाडूंना प्रत्येक दिवशी एक चाचणी द्यावी लागेल. शिबिरासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मे महिन्यात प्रत्येकाचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
वेस्ट इंडिजचा महिला संघ एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघ ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर सामने खेळवले जातील. यापूर्वी पाकिस्तानने वेस्ट इंडिजमध्ये तीन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामने खेळले होते. पाकिस्तानचा पुरुष संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे.
