सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील नेमके सत्य येणार बाहेर


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने इस्राईलच्या एनएसओ कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून भारतात अनेकांवर हेरगिरी केल्याच्या आरोपांवरील याचिकांची सुनावणी करताना मोठा निर्णय घेतल्यामुळे या प्रकरणातील नेमके सत्य आता बाहेर येणार आहे. या निर्णयानुसार तज्ज्ञांची विशेष समिती पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे सत्य हिच समिती समोर आणेल. पेगॅससप्रकरणी ३ वेगळ्या खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ करत आहे. न्यायालयाने बुधवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत कोणत्याही व्यक्तीवर अशाप्रकारची हेरगिरी करण्यास परवानगी देता येणार नसल्याचेही स्पष्ट मत व्यक्त केले.

५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी या मागणीसाठी काही खटले दाखल झाले आहेत. न्यायालयाने याच खटल्यांची सामूहिक सुनावणी करताना आता तज्ज्ञांच्या समितीमार्फत तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ३० जुलै रोजी या पेगॅसस हेरगिरीप्रकरणाचे व्यापक परिणाम असू शकतात, असे सांगितले. सरन्यायाधीश रमण यांनी यावर हा युक्तीवाद मान्य करत या खटल्यांची सुनावणी आवश्यक असल्याचे निरिक्षण नोंदवले होते.

इस्राईलच्या या पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून अनेक प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, राजकारणी आणि न्यायव्यवस्थेतील व्यक्तींवर हेरगिरी केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. ज्येष्ठ पत्रकार एन. राम, शशी कुमार यांचाही या याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. केंद्रीय संस्था देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विरोधी मते चिरडण्यासाठी पेगॅससचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने किंवा केंद्रीय तपास संस्थेने कोणत्याही कारणाने पेगॅससचे लायसन्स घेतले का आणि वापर केला का याची माहिती देण्यासाठी २७ जुलै रोजी दाखल झालेल्या एका याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाची ही तज्ज्ञांची समिती करणार चौकशी
डॉ. नवीन कुमार चौधरी (सायबर सुरक्षा तज्ज्ञ, गांधीनगर, गुजरात)
डॉ. प्रबाहरन पी. (स्कूल ऑफ इंजिनियरींग, केरळ)
डॉ. अश्निन अनिल गुमस्ते (आयआयटी, मुंबई)