अमृता फडणवीस दिवाळी निमित्ताने चाहत्यांसाठी घेऊन येणार नवीन गाणे


अवघ्या काही दिवसांवर दिव्यांचा सण अर्थात दिवाळी येऊन ठेपली आहे. देशासह राज्यात सगळीकडे दिवाळीच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे तुमच्या भेटीला येणार आहे. त्यांचे हे नवे गाणे म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे. त्या हे गाणे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे. याबाबतची माहिती अमृता यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आहे.


ट्विटवर अमृता यांनी एक पोस्ट शेअर करत या गाण्याची माहिती दिली आहे. अमृता यांनी ही पोस्ट शेअर करत या गाण्यात सोनू निगम असल्याची माहिती दिली आहे. लवकरच प्रेक्षकांसाठी महालक्ष्मीची आरती येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या असून या आरतीचे पोस्टर देखील त्यांनी रिलीज केले आहे. त्यांच्यासह गायक सोनू निगम या पोस्टरवर दिसून येत आहे. या आरतीचे ‘ओम जय लक्ष्मी माता’ असे बोल आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणा-या अमृता यांचे लाखो चाहते आहेत. त्या नेहमीच सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील बेधडकपणे वक्तव्य करतात. अमृता या बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोल केल्याचे देखील दिसून आले आहे. अगोदरच्या अनेक गाण्यामुळे अमृता यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.