पाक अँकरने लाइव्ह कार्यक्रमात शोएब अख्तरचा अपमान करुन हाकलून दिले


यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानचा क्रिकेट संघ जबरदस्त कामगिरी करत आहे, त्याचे जोरदार कौतुक केले जात आहे. पहिल्याच सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने भारतीय संघाचा पराभव करुन इतिहास घडवला. भारताचा विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच पाकने पराभव केल्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडचा देखील पराभव केला. पाकिस्तान एका बाजुला जबरदस्त कामगिरी करत असताना पाकिस्तानात मात्र एका लाइव्ह टेलिव्हिजन कार्यक्रमात दिग्गज माजी गोलंदाज शोएब अख्तर याला अपमानाला सामोरे जावे लागले.

पाकिस्तानात एका टेलिव्हिजन चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर खास क्रिकेट शोचे आयोजन करण्यात आले होते. यात कार्यक्रमाच्या अँकरने शोएब अख्तरचा अपमान करत त्याला लाइव्ह कार्यक्रमातून निघून जायला सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स देखील उपस्थित होते. याशिवाय पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडूही उपस्थित होते.


‘गेम ऑन’ नावाचा शो पाकिस्तानच्या ‘पीटीव्ही’ वाहिनीवर सुरू होता. शोएब अख्तरने यात पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राऊफ यांचे कौतुक केले. हे दोन गोलंदाज पाकिस्तान सुपर लीगमधील लाहौर कलंदर्स टीममधून पुढे आल्याचे शोएब अख्तरने म्हटले. कार्यक्रमाचा अँकर नौमान नियाज यांनी त्यावर अख्तरला रोखले. पाकिस्तानच्या अंडर-१९ क्रिकेट संघातून शाहीन आला असल्याचे नौमान यांनी म्हटले. शोएबने त्यावर मी हॅरीस राऊफ याच्याबाबत बोलत असल्याचे म्हटले. त्यावर नौमान यांचा पारा चढला आणि त्यांनी शोएब अख्तरचा अपमान करण्यास सुरुवात केली. तू माझ्याशी असभ्य भाषेत बोलत आहेस. मी येथे सांगू इच्छितो की जर तुला ओव्हरस्मार्ट बनायचे आहे तर तू शोमधून निघून जाऊ शकतोस आणि हे मी तुला ऑन एअर सांगत असल्याचे नौमान म्हणाला.

कार्यक्रमाला ब्रेकनंतर पुन्हा सुरुवात झाली आणि झालेला प्रसंग सावरण्याचा प्रयत्न शोएब अख्तरने केला. पण त्यात काही यश आलेले पाहायला मिळाले नाही. शोएब अख्तरने त्यानंतर शो मधून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मला खूप वाईट वाटले. पीटीव्हीमधून मी माझा राजीनामा देत आहे. राष्ट्रीय वाहिनीवर माझ्यासोबत ज्यापद्धतीने बोलले गेले, ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी येथून निघून जात आहे. धन्यवाद, असे म्हणत शोएब अख्तर कार्यक्रमातून निघून गेला. दरम्यान, शोएब अख्तरने त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट करत नेमके काय घडले याची सर्व कहाणी सांगितली आहे.