क्रूझ पार्टी प्रकरणात नवाब मलिकांचे पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप


मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची मालिका सुरुच आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी म्हटले आहे की, क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता. त्याठिकाणी त्याची गर्लफ्रेंड देखील होती. बंदूक घेऊन, तो दाढीवाला त्याठिकाणी होता. समीर वानखेडेंसोबत त्याची मैत्री आहे. यांनी गोव्यात देखील मोठे व्यवहार केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे.


एनसीबीला आम्ही सांगितले होते की एक दाढीवाला व्यक्ती होता. त्याठिकाणी त्याची मैत्रीण देखील होते. त्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ते व्हिडिओ आम्ही देऊ, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्या चौकशी समितीवर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. जर त्यांना दाढीवाला त्यांना मिळत नसेल किंवा त्याचे व्हिडिओ मिळत नसतील, तर मी त्याचे पुरावे अधिकारी ज्ञानेंद्र सिंग यांना देईल. त्यांनी तसे पुरावे मागावेत, असेही मलिक यांनी म्हटले आहे.


नवाब मलिक यांनी पुढे म्हटले आहे की, समीर वानखेडे, गोसावी, प्रभाकर आणि समीर वानखेडे यांचा ड्रायव्हर माने यांचा सीडीआर रिपोर्ट काढण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. आत्ताच मी एनसीबी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही कारण एनसीबी कदाचित आपल्यापेक्षा चार पावले पुढे चालत असेल. आणखी एक बाब म्हणजे मागच्या एक वर्षापासून एक प्रकरण पेंडिंग आहे. केवळ व्हॉट्सअॅपच्या चॅटच्या माध्यमातून दीपिका पादुकोण, साराअली खान, श्रद्धा कपूर यांना बोलावण्यात आले होते. पण त्यांना अटक केली नाही. त्यामुळे वानखेडेच्या मालदीवच्या पार्टीची माहिती घेण्यात यावी. कोण कोण तिथे होते याची माहिती घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.


नवाब मलिक पुढे म्हणाले की, काल मी माध्यमासोबत बोलत असताना एक एनसीबीच्या अज्ञात व्यक्तीकडून एक पत्र आले होते. मी दिल्लीला एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते पाठवले होते. त्यांनतर दुपारी आम्ही याची चौकशी करू असे सांगण्यात आले. पण त्यांनी संध्याकाळी पुन्हा त्यांचे म्हणणे बदलले. यावरून आता असे स्पष्ट होऊ लागले आहे की संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे मलिकांनी म्हटले आहे.


मी बोललो होतो की त्यांची नोकरी 6 महिन्यात जाणार आहे. कारण तसे पुरावे आहेत. खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन वानखेडे यांनी आयआरएसचे पद घेतले आहे. एका दलित मुलाचा अधिकार त्यांनी घेतला आहे. ज्यावेळी मी जन्मदाखला टाकला, त्यावेळी हा खोटा असल्याचा आरोप करण्यात आला, मग खरा कुठे आहे, तो वानखेडे यांनी सादर करावा, असे त्यांनी म्हटले आहे. सर्वांचे ऑनलाइन सर्टिफिकेट दिसते, पण केवळ समीर वानखेडे यांचा मात्र जन्मदाखला दिसत नाही. जर आपण बारकाईने पाहिले, तर त्यामध्ये लक्षात येईल की एका बाजूला दुसरे नाव लिहिण्यात आल्याचे मलिकांनी म्हटले आहे.

ज्यावेळी धर्म बदलण्यात येतो, त्यावेळी त्याचे लाभ बंद होतात. खासकरून मुस्लिम धर्मात ही बाब आहे. त्यामूळे खोटे कागदपत्रे सादर करून वानखडे यांनी नोकरी घेतली आहे. अनेक दलित संघटना समोर येऊन मला ही कागदपत्र मागत आहेत. मी त्यांना ही कागदपत्रे देणार असल्याचे ते म्हणाले. नवाब मलिकांनी आज सकाळी सकाळी पुन्हा ट्वीट करत वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत काही दावे केले आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुरुवार 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि सबाना कुरेशी यांच्यात लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) मुंबई येथे निकाह पार पडला. मेहेरची रक्कम रु.33000 होती.

समीर दाऊद वानखेडेची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडेचा अजिज खान पती साक्षीदार क्रमांक 2 होता, असा दावा मलिकांनी केला आहे. सोबतच दुसऱ्या आणखी एका ट्विटमध्ये नवाब मलिकांनी म्हटले आहे की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे, तो त्यांच्या धर्माचा नाही. त्यांनी ज्या फसव्या मार्गाने आयआरएसची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले, ते मला समोर आणायचे अशल्याचे मलिकांनी म्हटले आहे.