पंच प्रभाकर साईल यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला; आज एनसीबीकडून चौकशीची शक्यता


मुंबई – कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात तडजोड करण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलने मुंबई पोलिसांकडे रात्री आपला जबाब नोंदवला आहे. प्रभाकर साईल मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता मुंबई पोलिसांचे झोन वनच्या डिसीपींच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 8 तासांपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील प्रभाकर साईल मुख्य साक्षीदार आहे. तर दुसरा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्डही आहे.

प्रभाकर साईलचा दावा आहे की, मुंबई ड्रग्स प्रकरणात तडजोडीसाठी 25 कोटी रुपयांच्या डीलबाबत ऐकल्यानंतर 18 कोटी रुपयांची डील फायनल होणार होती. विशेष म्हणजे, त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. किरण गोसावी व्यवसायाने गुप्तहेर आहे आणि ड्रग्ज केस प्रकरणातील पंचही आहे. माध्यमांसमोर येऊन प्रभाकर साईलने केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर किरण गोसावी फरार आहे. प्रभाकरचे असे म्हणणे आहे की, या प्रकरणातील सत्य जेव्हापासून त्यांनी सर्वांसमोर आणले आहे, तेव्हापासून गोसावी फरार आहेत, त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे.

आपल्या प्रतिज्ञापत्रात प्रभाकर यांनी सॅम डिसूझा नावाच्या एका व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. प्रभाकरने दिलेल्या माहितीनुसार, सॅम डिसूझाशी त्यांची भेट एनसीबीच्या ऑफिसबाहेर झाली होती. ते त्यावेळी केपी गोसावीला भेटण्यासाठी गेले होते. दोघेही एनसीबी ऑफिसमधून लोअर परेलमध्ये बिग बाजारजवळ गाडीने गेले होते. प्रतिज्ञापत्रात असा देखील दावा करण्यात आला आहे की, सॅम नावाच्या व्यक्तीशी गोसावीने फोनवर 25 कोटी रुपयांपासून बोलणे सुरु करुन 18 कोटी रुपयांमध्ये डिल फायनल केली होती. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते.

आर्यन खानच्या सुटकेसाठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून मुंबई क्रुज ड्रगप्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईलनी त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना आहे. प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्यामुळे प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.

आपल्या मोबाईलमध्ये प्रभाकरने दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील एक व्यापारी हेनिक बाफना यांचा आहे. प्रभाकर साईल यांना मी दोन महिन्यापूर्वी व्यवसायानिमित्त भेटलो होतो. पण, त्याच्याशी माझा कुठलाही व्यवहार झाला नाही, असा तक्रारी अर्ज संबंधित व्यक्तीने पोलीस अधिक्षकाकडे दिला. माझ्या प्रोफाइलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी करीत असल्याचे बाफना यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. तसेच या अर्जातून माझी बदनामी करणाऱ्या प्रभाकर यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील मनोर येथील आरोपी किरण गोसावी हा रहिवासी असून पालघरमध्ये त्याने अनेक वेळा फेऱ्या मारल्याची माहिती पुढे येत असून त्याचा अनेक लोकांशी व्यवहार झाल्याची चर्चा आहे.