दुबईत यंदा दिवाळीची जोरदार धूम

भारतात दिवाळीची चाहूल लागली असून जागोजागीच्या बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. करोना मुळे गेली दिवाळी निरुत्साहात गेली पण यंदा करोनाचे सावट थोडे विरळ झाल्याने नागरिक उत्साहात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. विशेष म्हणजे भारताप्रमाणे यंदा दुबई मध्ये सुद्धा दिवाळीची जोरदार धूम असल्याचे चित्र आहे. स्थानिक सरकारने प्रवासावरील निर्बंध दूर केले आहेत शिवाय दुबई एक्स्पो आणि टी २० वर्ल्ड कप मुळे गेल्या  २४ दिवसात किमान १५ लाख प्रवासी दुबईत आले आहेत. यामुळे व्यापारी आणि स्थानिक भारतीय समुदाय दिवाळी मूड मध्ये आला आहे.

गेल्या वर्षी करोना मुळे दुबईच्या प्रसिद्ध सोने बाजारात फारशी वर्दळ नव्हती पण यंदा मात्र दुबईचा गोल्ड सुक बाजार सजला असून यंदाच्या सिझन मध्ये किमान ३० टन म्हणजे तब्बल ३० हजार किलो सोने विक्री होईल असे सोनेबाजारातील प्रसिद्ध व्यापारी सांगत आहेत. दुबई गोल्ड व ज्वेलरी ग्रुपचे उपाध्यक्ष व सिरोया ज्वेलर्सचे मालक चंदू सिरोया म्हणाले जेथे भारतीय समुदाय मोठ्या संखेने राहतो त्या देशातील बाजारांना यंदा दिवाळी भरभराटीची ठरणार आहे. दुबई मध्ये मोठ्या संखेने भारतीय आहेत. एक्स्पो २०२० आणि टी २० वर्ल्ड कप साठी अनेक पर्यटक दुबईत आले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्याच दुकानात किमान ३ टन सोने विक्रीचे ध्येय ठेवले आहे.

तसेही दिवाळीत सोने विक्री साधारण २० टक्क्यांनी वाढते पण यंदा लोकही खरेदीसाठी उत्सुक आहेत. एक्स्पो २०२० मध्ये इंडियन पॅव्हेलियनवर दिवाळीची जोरदार तयारी केली गेली आहे आणि पूर्ण एक्स्पो साईटवर दिवाळीची रोषणाई केली जात आहे. येथे भारतीय संस्कृती संदर्भात एक प्रदर्शन भरविले जात असल्याचेही सांगितले जात आहे.