नवाब मलिक यांच्या ट्विटला समीर वानखेंडेंचे प्रतिउत्तर


मुंबई – रोज नवनवे खुलासे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा समावेश असलेल्या ड्रग्स प्रकरणात होत आहेत. त्याचबरोबर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना समीर वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक माझी मृत आई आणि तिचा धर्म या प्रकरणात मध्ये का आणत आहेत, असा सवाल केला आहे.

समीर वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे कि समीर दाऊद वानखेडे, येथून सुरू झाला होता हा खोटारडेपणा. दरम्यान, मलिक यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, नवाब मलिक यांनी आपल्या जन्माच्या प्रमाणपत्रासंदर्भात नुकत्याच केलेल्या ट्विटबद्दल मला कळले. या प्रकरणाशी माझ्या जन्म प्रमाणपत्राचा काहीच संबंध नाही. तरीही हे सर्व येथे एकत्र करण्याचा घाणेरडा प्रयत्न आहे. माझी आई मुस्लिम होती म्हणून त्यांना माझ्या मृत आईला या सगळ्यात आणायचे आहे का? माझी जात आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पडताळून पाहण्यासाठी तो, तुम्ही किंवा कोणीही माझ्या जन्मगावी जाऊन माझ्या पणजोबांकडून माझ्या वंशाची पडताळणी करू शकतात, पण त्यांनी अशी घाण पसरवू नये. मी हे सर्व कायदेशीररित्या लढेन आणि न्यायालयाबाहेर यावर जास्त भाष्य करू इच्छित नसल्याचे त्यांनी सुत्रांशी बोलताना म्हटल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.