यामुळे पाकिस्तानविरोधातील सामन्याआधी गुडघ्यावर बसले होते टीम इंडियाचे खेळाडू


दुबई – रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील झालेल्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत करत इतिहास रचला. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा हायव्होल्टेज सामना सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू राष्ट्रगीत संपल्यानंतर गुडघ्यावर बसले होते. सध्या सोशल मीडियात सामना सुरू होण्याआधी खेळाडू गुडघ्यावर बसून असल्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांमध्ये या फोटोवरुन समर्थन देणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडले आहेत.

दरम्यान, फोटो व्हायरल झाल्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू गुडघ्यावर का बसले होते, असा प्रश्न देखील काही क्रिकेट चाहत्यांना पडला होता. तर, जगभर सुरू असलेल्या ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी खेळाडू गुडघ्यावर बसले होते. ही चळवळ अमेरिकेत कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरोधात सुरू आहे. जॉर्ज फ्लाइडची गेल्या वर्षी हत्या झाल्यानंतर जगभरात या चळवळीने जोर धरला होता.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने सांगितले की, याबद्दल मॅनेजमेंट आम्हाला विचारणा केली होती. त्यानंतर आम्ही गुडघ्यांवर बसून आदरांजली वाहिली. तर पाकिस्तान संघाने देखील सामना सुरू होण्यापूर्वी आदरांजली वाहिली.