मुंबई – गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गायब आहेत. सुनावणीसाठी ते न्यायालयात देखील येत नसल्यामुळे आणि तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर होत नसल्यामुळे ते फरार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने यासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यासोबत जोडण्यात आलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीमुळे परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परमबीर सिंह चंदीगढमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
‘पॉवर ऑफ अॅटर्नी’मुळे बेपत्ता परमबीर सिंग चंदीगढमध्ये असल्याचा संशय बळावला!
परमबीर सिंह यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांनंतर त्यांच्या विरोधात देखील अनेक आरोप झाले आहेत. निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या आयोगासमोर यासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीसाठी सातत्याने विचारणा करून देखील परमबीर सिंह उपस्थित राहिले नसल्यामुळे ते नेमके कुठे आहेत? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात तपास करण्यासाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी याच आयोगासमोर सुरू आहे.
दरम्यान, परमबीर सिंह सातत्याने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सुनावणीसाठी गैरहजर रहात आहेत. सीबीआयकडून देखील सुरू असलेल्या तपासासाठी ते उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. पण, अशातच परमबीर सिंह यांनी त्यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रासोबत खुद्द परमबीर सिंह यांनी तयार केलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीमुळे त्यांचा ठावठिकाणा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चंदीगढमध्ये परमबीर सिंह यांनी ही पॉवर ऑफ अॅटर्नी तयार केली आहे. चंदीगढचाच पत्ता कागदपत्रांवर असल्यामुळे ते चंदीगढमध्येच असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परमबीर सिंह यांनी ही पॉवर ऑफ अॅटर्नी महेश पांचाल या व्यक्तीच्या नावे बनवली असून आपल्या ऐवजी महेश पांचाल न्यायालयीन आयोगासमोर सुनावणीसाठी उपस्थित राहतील, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना आयोगासमोर काहीही सांगायचे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोणताही युक्तीवाद किंवा प्रतिवाद करण्यासाठी परमबीर सिंह यांच्याकडे कोणतेही पुरावे नसून त्यांना आयोगासमोर काहीही मत मांडायचे नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.