अजित पवारांना पडला स्वतःच्याच मास्क घालण्यावरुन दिलेल्या लेक्चरचा विसर!


पुणे : कोरोना नियमावलीचे कटाक्षाने पालन करणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे ओळखले जातात. त्याचबरोर ते सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालणे, इतरांना घालायला सांगणे, सॅनिटायझर सोबत ठेवणे याबाबत सतर्क असतात. पण अजित दादांच्या काल पुण्यात झालेल्या सभेत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे पाहायला मिळाले. मावळमध्ये काल राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त एक सभा झाली. तुफान गर्दी या सभेला झाली. पण ही सभा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाषणांनी गाजली. विशेष म्हणजे या सभेत आमदार सुनील शेळकेंनीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना मास्क काढून भाषण करण्याचा आग्रह धरल्यामुळे अजित पवारांनी पहिल्यांदाच विना मास्क भाषण केले. पण त्यावरुन आता अजितदादांना त्यांच्याच मास्कबद्दलच्या वक्तव्याचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मावळच्या कार्यक्रमाच्या काही तास आधी अजित पवार यांनी लोणावळ्यातील कार्यक्रमात मास्क घालण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी असे म्हटले होते की, पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यातील मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठेवला होता. तेव्हा पन्नास कोटी रुपये दंड वसूल केला गेला. नियम एवढा झुगारला. आता जे सापडले त्यांचा हा आकडा आहे. मग न सापडलेले किती असतील, विचार करा. तर अशी वेळ पुन्हा येऊन देऊ नका. आम्ही खूप अभ्यासपूर्वक हे सांगत आहोत. कृपया मास्क काढून फिरू नका. मी तर हा मास्क फक्त जेवताना, पाणी पिताना आणि रात्री झोपतानाच काढतो. नाही तर मास्क काढतच नाही. त्याला काही इलाज नाही. कारण जो पर्यंत धोका आहे, तोपर्यंत काळजी घेणे आपल्याच हातात असल्याचे अजित पवारांनी म्हटले होते. बाबांनो जरा काळजी घ्या, येथे तर आत्ता एकाच्या तोंडावर मास्क दिसेना, बघा-बघा त्यांचा हा मास्क तोंडाखाली आहे. एकदा कोरोना झाला की निम्मा महिना तर घरीच जातो. म्हणून जरा मास्क वापराच, असे अजित पवारांनी म्हटले होते.

नंतर काही वेळानेच मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या कार्यक्रमासाठी अजित दादा मावळमध्ये पोहोचले. या कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसला, अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हता. या कार्यक्रमात अजित दादा सगळे हट्ट पुरवतात, आता एकच हट्ट पुरवा, फक्त मास्क काढून बोला, अशी विनंती मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केली आणि अजित पवार मास्क काढून भाषणाला उभे राहिले. पण दुपारी लोणावळ्यात मी फक्त जेवण करताना, पाणी पिताना आणि रात्री झोपताना मास्क काढतो, असे म्हणणाऱ्या अजित पवारांना आपल्या वक्तव्याचा विसर पडला. असा प्रतिसाद मावळ तालुक्यात मला याआधी मिळाला नव्हता. पण आज तुम्ही येथे आलात हे पाहून आनंद झाला. इतिहासातील काही दाखले ही दिले, असेही ते म्हणाले.

अजित पवार यानंतर म्हणाले की, कायमच मास्क घालून मी बोलायचो. पण आज या पठ्ठ्याने मास्क काढून बोलायची मागणी केली. मी मास्क काढणार नव्हतो. पण आता वाढदिवस असताना दादांनी माझी एवढीशी इच्छा पूर्ण केली नाही. असे हा म्हणणार. म्हणून मास्क काढला. पण बाबांनो मास्क घाला, कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. तेवढ्यात खालून एक जण म्हणाला, दादा तिसरी लाट येत नाही, त्यावर अजित पवार म्हणाले तुझ्या तोंडात गूळ-साखर, पण बाबा नुसते असू म्हणू नकोस. किमान मास्क तरी घाल. मास्क घालून बोलला असता तर चालले असते. पण हे सांगताना दादांनी मात्र स्वतः मास्क घातला नव्हता.