मुलाची भेट घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहात दाखल झाला शाहरुख खान


मुंबई : काल सत्र न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज फेटाळल्यानंतर आज शाहरुख खान स्वत: आर्यनची भेट घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. दहा मिनिटे आर्यनशी शाहरुखने संवाद केला. कालही जामीन अर्ज फेटाळल्यामुळे क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. काल मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. काल न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी न्यायालयात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला होता.

काल मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या वकीलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. आर्यन खानच्या वकिलांना निकालाची तपशीलवार प्रत मिळताच त्यांनी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर केला आणि गुरूवारी म्हणजे आज तातडीची सुनावणी घेण्याचा विनंती अर्जही सोबत दाखल करण्यात आला होता.

30 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ आर्यनच्या वकिलांकडे आहे. कारण त्यानंतर 12 दिवस न्यायालयाला दिवाळीची सुटी असणार आहे. या 7 दिवसांत जर न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन न्यायालयाने आपला निर्णय दिला नाही, तर दिवाळीपर्यंत आर्यन खानला जेलमध्येच रहावे लागणार आहे. एनसीबीने न्यायालयात आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला, जो न्यायालयाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे.

3 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला एनसीबीने अटक केली. आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम एनसीबीला मिळाली नाही. न्यायालयात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचे सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.