श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची वर्षाला नुसत्या व्याजातून १८०० कोटींची कमाई


बृह्नमुंबई महानगरपालिका देशातील श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असून बीएमसीकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार बीएमसी कडे ८२ हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत आणि वर्षातून त्याच्या व्याजापोटी बीएमसीला १८०० कोटींची कमाई होते. बीएमसीने विविध खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतून ३४२ मुदत ठेवी ठेवलेल्या आहेत. बीएमसीने स्टँडिंग कमिटी समोर सादर केलेल्या अहवालात ही माहिती नमूद केली आहे.

मिडिया रिपोर्ट नुसार महापालिकेच्या या कोशातील ६० टक्के रक्कम आगामी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीत खर्च केला जाणार आहे. बीएमसीच्या अहवालानुसार ५६६४ कोटींच्या ठेवींची मुदत नुकतीच पूर्ण झाली आहे तर महसुलातून जमा झालेल्या पैशातून ९०७९ कोटींची नवी मुदत ठेव केली गेली आहे. सध्या महापालिकेकडे ८२,४१० कोटींच्या मुदत ठेवी असून बीएमसीची मुख्य ८५ टक्के कमाई बांधकाम क्षेत्रातून आहे. जीएसटी कॉम्पेन्सेशन, मालमत्ता कर, पाणी पट्टी, विकासकांना वाढवून दिला जाणारा एफएसआय आणि गुंतवणुकीतून मिळणारे व्याज हे बीएमसीच्या उत्पन्नाचे अन्य स्त्रोत आहेत.

बीएमसीकडे इतका प्रचंड पैसा असूनही या महानगराला आवश्यक त्या पायाभूत सुविधा मिळत नाहीत अशी टीका नेहमीच होते. यंदाच्या वर्षीचे बीएमसीचे बजेट ३९०३८.८३ कोटींचे आहे आणि देशातील अनेक राज्यांपेक्षा ते जास्त आहे. असे असले तरी बीएमसी देशातील सर्वोत्तम महानगरपालिका नाही. गतवर्षी ग्रेटर विशाखापट्टणम नगरपालिका परिषदेला हे अॅवॉर्ड दिले गेले होते.

बीएमसीच्या एकूण २२७ नगरसेवकांत शिवसेनेचे ९७, भाजपाचे ८३, कॉंग्रेसचे २९, एनसीपीचे ८, समाजवादीचे ६ नगरसेवक आहेत. यंदा फेब्रुवारी मध्ये बीएमसीच्या निवडणुका होत असून शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केला आहे. यंदाच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे कारण राज्यातील राजकीय गणिते बदललेली आहेत.