गोव्याचे पर्यटन मंत्री म्हणतात; आम्हाला फक्त श्रीमंत पर्यटक हवेत


पणजी – गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी गोव्याला श्रीमंत पर्यटक हवे आहेत, ड्रग्ज घेऊन गोंधळ घालणारे किंवा बसमध्ये बसवून जेवण बनवणारे नको, असे वक्तव्य केले आहे. आम्हाला ड्रग्ज घेणारे गोव्याची नासधूस करणारे पर्यटक नको आहेत. गोव्यातील बसमध्ये अन्न शिजवणारे पर्यटक आम्हाला नको आहेत. आम्हाला गोव्यात सर्वात श्रीमंत पर्यटक हवे आहेत. आमच्या संस्कृती, वारसा आणि गोव्याचा आदर करणारे पर्यटक आम्हाला हवेत. आम्ही सर्वच पर्यटकांचे राज्यात स्वागत करतो, परंतु त्यांनी संस्कृती आणि परंपरेच्या मर्यादा जपून गोव्याचा आनंद घ्यावा, असे आजगावकर म्हणाले. ते राज्य विधानसभेच्या चालू असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.

गोव्यात अलिकडे बसने पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहेत. हे पर्यटक पर्यटन क्षेत्रात रस्त्यांवर अन्न शिजवतात आणि खातात. त्यामुळे राज्य सरकारने अलीकडेच सार्वजनिक ठिकाणी स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे. गोव्याच्या रस्त्यांवर जेवण बनवणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तसेच ड्रग्जचे सेवन करून राज्यात गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांना सहन केले जाणार नसल्याचे मंत्री आजगावकर यांनी सांगितले. ड्रग्जच्या विरोधात आम्ही आहोत. आमचे सरकार देखील याच्या विरोधात आहे, आमचे मुख्यमंत्री याच्या विरोधात आहेत, मी त्याच्या विरोधात असल्याचे पर्यटन मंत्री म्हणाले.

गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पाच लाख मोफत व्हिसा देण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयामुळे फायदा होईल. राज्यातील पर्यटन आता खुले होणार आहे. पंतप्रधानांनी पाच लाख मोफत व्हिसाची घोषणा केली आहे. येत्या काळात चार्टर फ्लाईट्स सुरू होतील. आम्ही आधीच शॅक आणि हॉटेल परवान्यांशी संबंधित ५० टक्के शुल्क माफ केल्याचेही आजगावकर म्हणाले.