बिल गेट्स यांच्या मुलीने घोडेस्वाराशी बांधली लगीनगाठ


न्यूयॉर्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या अब्जाधीश बिल गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्स ही विवाहबद्ध झाली आहे. मिस्रचे घोडस्वार नायल नासरशी जेनिफर विवाहबद्ध झाली आहे. यांचा लग्नसोहळा न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर येथे पार पडला. शुक्रवारी जेनिफर आणि नायल यांचा विवाहसोहळा पार पडला. परंतु, या लग्नाची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. नॉर्थ यॉर्कमधील नॉर्थ सालेममध्ये 142 एकरच्या मालमत्तेच्या बागेत हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. बिल गेट्सच्या मुलीच्या लग्नात सुमारे 300 पाहुणे उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 2017 सालापासून जेनिफर आणि नायल हे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. दरम्यान, 2020 साली या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, जेनिफर ख्रिश्चन धर्माचा आहे. तर, नायल हा मुस्मिल आहे.

जेनिफरने तिच्या लग्नाच्या खास दिवशी कस्टम वेरा फुल स्लीव्ह वेरा वांग गाऊन परिधान केला होता. जेनिफरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तिला नऊ वधू-वरांनी मिळून तयार केले होते. तर नयालने या लग्नात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि बॉटी असलेला काळा टक्सिडो परिधान केल्याचे सोशल मीडियावरील फोटोमध्ये दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फक्त नातेवाईकांना आणि मित्रांना रिसेप्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या रिसेप्शनमध्ये अब्जाधीश मायकेल ब्लूमबर्गची मुलगी जॉर्जिना ब्लूमबर्ग देखील दिसली. जेनिसर आणि नायल यांच्या विवाहाची अनेकांना उत्सुकता होती. पण, फारच गुप्तता बाळगून विवाह सोहळा पार पडल्यामुळे अनेकजण निराश झाले आहेत.

वेडिंग प्लॅनर मार्सी बाल्मच्या खांद्यावर जेनिफर आणि नायल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. अंदाजे दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 15 कोटी रुपये एवढा खर्च या विवाह सोहळ्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर या वर्षी ऑगस्टमध्ये घटस्फोट घेतला होता. परंतु, जेनिफरच्या विवाहदरम्यान दोघेही पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले आहेत.