बंगळुरु – कर्नाटकमधील भाजप प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून तस्कीरदेखील करतात, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अशिक्षित असा उल्लेख काँग्रेसने केल्यामुळे आधीच वाद निर्माण झालेला असताना आता भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडली आहे. मोदींबद्दलच्या त्या ट्विटवरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी आक्षेप नोंदवला असून ट्विट डिलीट करण्याचा आदेश दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून तस्करीदेखील करतात; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही आहे. राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ते ड्रग्जची तस्करदेखील करत आहेत. हे मीडियात आले होते. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नसल्याचे नलीन कुमार कटील यांनी म्हटले आहे. दरम्यान मोदींसंबंधीच्या ‘त्या’ ट्विटनंतर डी शिवकुमार यांनी म्हटले आहे की, राजकीय चर्चा करताना नेहमी नागरी आणि संसदीय भाषेचा वापर करण्यात आला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. तसेच सोशल मीडिया मॅनेजरने कर्नाटक काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेले असंसदीय ट्विट खेदजनक असून काढण्यात येत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर त्यांनी याची आठवण करुन दिली.
नलीन कुमार कटील यांनी माफी मागावी अशी मागणी डी शिवकुमार यांनी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण राजकारणात विरोधकांसोबतही आदराने वागले पाहिजे, असे मी काल म्हटले होते. भाजप माझ्यासोबत सहमत असेल आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागेल अशी अपेक्षा करतो.