मुंबई – सध्या ईडीकडून शिवसेना खासदार भावना गवळी यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने भावना गवळी यांना गेल्या महिन्यात २७ सप्टेंबरला समन्स बजावले होते. ईडीकडून त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले आहे. येत्या २० तारखेला अर्थात बुधवारी भावना गवळी यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. ही चौकशी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात सुरू आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने पुन्हा बजावले समन्स!
भावना गवळींच्या निकटवर्तींयांना याआधी देखील ईडीकडून समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.