दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही; भाजप आमदाराचा शरद पवारांना टोला


मुंबई – नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर भाजप आमदार अतुल भातखळकर टीका करत असतात. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.

भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल- इति शरद पवार. महाविकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही.

दरम्यान शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभे आहे.

आपला ५ वर्षांचा कार्यकाळ उद्धव ठाकरेंचे सरकार पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांची बैठक झाली. त्यावेळी आमच्याकडे दोन तीन जणांची नवे पुढे आली. परंतु मी कुठलाही वेळ न लावता उद्धव ठाकरेंचा हात धरुन वर केला आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. पण उद्धव ठाकरे तयार नव्हते. पण त्यांनी माझ्या एका शब्दावर मुख्यमंत्री होण्याचे मान्य केले, असा दावा शरद पवार यांनी केला होता.