संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान


सांगली : पुन्हा एकदा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. संभाजी भिडेंनी सांगलीत बोलताना म्हटले आहे की, आपला देश जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश, मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. आपण तो क्रमांक एक मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत आपल्याला जमले नाही त्या गोष्टीत चीन पुढे आहे, जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी आहे, पण हिंदूना मेंदू असतो. आपला क्रमांक यात एक आहे, तो म्हणजे निर्लज्जपणात. जगात 187 देश आहेत. त्या देशात बेशरमपणाचा हा देश आहे. आपल्या लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असल्याचे संभाजी भिडे म्हणाले आहेत.

संभाजी भिडे पुढे म्हणाले की, दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत. प्रभू रामचंद्र जसे विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले, तसे राज्यकर्त्यांचा विवेक हरवला आहे. शिवाजी-संभाजी महाराजांची अंतकरणात वस्ती असती, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून दसऱ्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे राज्यकर्त्यांवर आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकले आहेत. जसे सोन्याच्या हरणाची भुरळ प्रभू रामचंद्रांना पडली आणि आपला विवेक राम हरवून बसले आणि त्या सोन्याच्या हरणाची शिकार करायला गेले, पुढे सीतेचे अपहरण झाले, तसे आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी,मेंदू विकारवश झाले आहेत, त्यामुळेच तर दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी दिली नाही.

पण लॉकडाऊन झाल्यानंतर हेच राज्यकर्ते 21 व्या दिवशी महसूल वाढतो म्हणून राज्यभरातील दारूची दुकाने उघडी ठेवा म्हणून सांगतात आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालतात, ते राज्यकर्ते बेशरम, नालायक असल्याचे म्हणत भिडेनी सरकारवर टीका केली आहे. दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलताना संभाजी भिडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुन्हा एकदा कोरोनावर बोलताना भिडे यांनी चीनवर टीकेची झोड उठवली. कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. कोरोना थोतांड असल्याचे भिडे म्हणाले.