वयोमर्यादेमुळे लस न घेऊ शकलेल्या 18 वर्षा खालील मुलांनाही रेल्वे प्रवासाची मूभा


मुंबई : राज्यातील नागरिकांना दसऱ्याच्या मुहूर्तावर रेल्वे प्रशासनाने एक चांगली बातमी दिल्ली आहे. वयोमर्यादेच्या अटीमुळे 18 वर्षाच्या खालील मुलांना आणि काही तांत्रिक अडचणीमुळे लस घेऊ न शकलेल्या नागरिकांना आजपासून रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पण 18 वर्षाखालील मुलांना रेल्वे प्रवासा दरम्यान आपले ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या 18 वर्षाखालील मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. ज्या लोकांनी आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्याला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा. आता 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी तिकीट मिळणार आहे. अशा लोकांनी तिकीट काढतेवेळी तसे डॉक्टरांचे प्रमाणपत्रक सादर करणे आवश्यक असणार आहे.