आयकर विभागाच्या छाप्यात सापडल्या कपाटभरुन ५०० च्या १४२ कोटी रुपयांच्या नोटा


हैदराबाद – हैदराबादमधील एका फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये ५५० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ५०० च्या नोटा या छाप्यामध्ये एका कपाटात आढळून आल्या असून ही रक्कम १४२ कोटी ८७ लाख एवढी असल्याची माहिती समोर येत आहे. या छाप्यादरम्यान सापडलेल्या या रोख रक्कमेचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

आयकर विभागाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार ज्या कंपनीवर छापा टाकण्यात आला, ती कंपनी परदेशात औषधे पाठवणारी कंपनी आहे. या कंपनीने निर्माण केलेली औषधांची निर्यात अमेरिका, युरोप, दुबई आणि आफ्रिकन देशांमध्ये केली जाते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारीदरम्यान एक कपाट उघडले आणि त्यांना समोरचे दृष्य पाहून धक्काच बसला. ५०० च्या नोटांचे अनेक गड्ड्या एका मोठ्या कपाटामध्ये ठेवण्यात आल्याचे त्यांना दिसून आले.


छापा टाकण्यात आलेली कंपनी ही हेटेरो फार्मास्युटिकल समुहामधील कंपनी असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारपासून राज्यामधील ५० वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केलीय. आयकर विभागाला या छाप्यांमध्ये खात्यांची माहिती असणारी पुस्तके, डिजिटल उपकरणे, पेन ड्राइव्ह आणि बरीच कागदपत्रे हाती लागली आहेत. अनेक बनावट तसेच अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. हा काळापैसा लपवण्यासाठी व्यवहार झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आलेले. तसेच जमीन खरेदीचा व्यवहार झाल्याचेही पुरावे या छापेमारीमध्ये सापडले आहेत.

कंपनीच्या नावे अनेक बँक लॉकर्स असल्याचे तपासादरम्यान समोर आले असून १६ लॉकर्स नियमितपणे वापरले जात आहे. या छापेमारीमध्ये पैसे भरुन ठेवलेले एक संपूर्ण कपाट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून सोशल नेटवर्किंगवर या कपाटाचे फोटो व्हायरल झाले आहेत.