नवी दिल्ली – आपल्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल याच्या दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या पालकांना अखेर दिलासा मिळाला आहे. लहान मुलांच्या लसीकरणाला भारतीय औषध नियंत्रक मंडळाने मान्यता दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास भारत सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस बनली आहे, जी मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे.
तज्ज्ञ समितीकडून लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी
कोव्हॅक्सिनच्या या मंजुरीनंतर, लवकरच केंद्र सरकार २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल. मुलांवर लसीकरणासाठी मान्यता मिळण्यापूर्वी कोव्हॅक्सिनला दीर्घकाळ चाचणी करावी लागली. १८ वर्षाखालील मुलांवर तीन टप्प्यात भारत बायोटेकने चाचणी पूर्ण केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्या. यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे.
कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस प्रौढांप्रमाणेच मुलांनाही दिले जातील. आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांमध्ये, कोव्हॅक्सिनचा मुलांवर कोणताही वाईट परिणाम दिसला नाही. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, ही लस ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. यानंतर, ही लस केंद्राने मंजूर केली आहे.