राष्ट्रवादी चित्रपट आघाडीचा ‘गोडसे’ चित्रपटाचे चित्रीकरण-प्रदर्शन उधळून लावण्याचा इशारा


2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी नथूराम गोडसेच्या जीवनावरील ‘गोडसे’ चित्रपटाची घोषण करत ‘टिझर’ लाँच केला होता. यावर या चित्रपटाच्या निमित्ताने सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. यात आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकरांच्या या प्रस्तावित चित्रपटाला विरोध करीत टीका केली होती.

त्यानंतर आता या चित्रपटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट विभागाने थेट आरपारच्या लढाईचाच इशारा दिला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण आणि पुढे चित्रपट तयार झाला तरी प्रदर्शन बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. महेश मांजरेकरांना हा इशारा पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे. यासोबतच महेश मांजरेकर ‘होस्ट’ करीत असलेल्या ‘बिग बॉस’चे लोणावळ्यातील सेटवरचे चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागाने दिली आहे.

यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील पक्षाच्या चित्रपट विभागाची सविस्तर भूमिका मांडताना म्हणाले की, गांधी जयंतीनिमित्त नवीन ‘गोडसे’ नावाच्या चित्रपटाची चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर यांनी घोषणा केली. सोबतच या चित्रपटाचा ‘टीझर’ त्यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावरच रिलीज केला. घोषणा केलेला हा चित्रपट महेश मांजरेकरांच्या हीन वैचारिक पातळीची साक्ष देणारे असल्याचा टोला बाबासाहेब पाटील यांनी मांजरेकरांना लगावला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वातंत्र्य मिळवण्यात अद्वितीय काम होते. त्याच महात्म्याच्या जयंतीदिनी त्यांचाच मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण करण्याची घोषणा करणे मूर्खपणाचा घाट महेश मांजरेकर यांनी घातल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतो’ हा चित्रपट तयार करून महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधुनिक विचारांचा वारसा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत. यासाठी त्यांचा महाराष्ट्रातील जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही नेहमी सन्मान सुद्धा केल्याचे पाटील म्हणाले. विकृत मानसिकता नथुराम गोडसे यांच्यावरील चित्रपट निर्मितीमागे असलेल्या कोणत्या यंत्रणेचा तर हात नाही ना?, असा सवाल राष्ट्रवादी चित्रपट आघाडीने यानिमित्ताने केला आहे.

मांजरोकरांचा महात्मा गांधीच्या लोकप्रियतेला ठेस पोहोचवून त्यांच्याप्रती द्वेष निर्माण करून नथुराम गोडसेला ‘हिरो’ करण्याचा प्रयत्न तर नाही ना?, असा सवाल त्यांनी मांजरेकरांना केला आहे. अशा विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण महाराष्ट्राच्या मातीत करण्याचे काम कुणी ही केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे उपद्व्याप कदापिही खपवून घेणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने दिला आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण भविष्यात महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात होऊ देणार नसल्याचा इशारा बाबासाहेब पाटील यांनी महेश मांजरेकरांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चित्रीकरण उधळून लावणार असल्याचा गर्भित इशाराच त्यांनी यानिमित्ताने दिला आहे. यासोबतच यदाकदाचित हा चित्रपट याऊपरही तयार होऊन प्रदर्शित होणार असेल, तर त्याला महाराष्ट्रातील कोणत्याच चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्यावतीने बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान महेश मांजरेकरांनी या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रकल्प मागे घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागाने केली आहे. मांजरेकरांनी याही परिस्थितीत माघार न घेतल्यास निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. त्याचबरोबर मांजरेकर सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘बिग बॉस’चे लोणावळ्यातील सेटवरचे चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागाने दिली आहे.