‘या’ ठिकाणी लपवले होते आर्यन खानने ड्रग्ज


मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. अमली पदार्थ घेऊन प्रवासी जहाजावर गेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. चार विविध प्रकारच्या अमली पदार्थासह सुमारे दीड लाखाची रोख रक्कम आरोपींकडून जप्त करण्यात आली. रविवारी आर्यनसह तिघांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त केली आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सशयितांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना आर्यन खानने डोळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सच्या डबीत ड्रग्ज लपवले असल्याचे समोर आलं. याशिवाय इतर आरोपींनी सॅनिटरी पॅड्स आणि औषधांच्या बॉक्समध्ये ड्रग्ज लपवले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने लेन्स बॉक्समध्ये ड्रग्ज लपवले होते. त्याला नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्टच्या (NDPS) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

दरम्यान आर्यन खानने आपल्या मित्रांसोबत चॅट करताना अनेकदा बेकायदेशीर ड्रग्जचा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे. एनसीबीला धाड टाकल्यानंतर चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज सापडले आहेत. आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज एकाच खोलीत राहात होते. आर्यनवर सेवनाचा, तर उर्वरित दोघांवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा यांना सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. तीनही आरोपींना सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालायापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागली.

कोर्डेलिया क्रूझचे मालक जुर्गेन बैलोम या कारवाईसंदर्भात म्हणाले, की या प्रकरणाशी कोर्डेलिया क्रूझचा कोणताही संबंध नाही. अशा कृत्यांचा आम्ही निषेध करत असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील राहू. ‘एनसीबी’ला रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा घालण्यासाठी २० अधिकाऱ्यांचे पथक प्रवासी असल्याची बतावणी करून क्रूझवर दाखल झाले होते. आठ संशयितांना या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित प्रवाशांना क्रूझमधून प्रवासाची मुभा देण्यात आली.