हरयाणा – शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचाराची घटना ताजी असतानाच हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आता शेतकऱ्यांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. कार्यकर्ते हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उभे करा, जशास तसे उत्तर द्या. उचला लाठ्या, असे भडकावू वक्तव्य खट्टर यांनी केले आहे. मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी (३ ऑक्टोबर) भाजप किसान मोर्चाच्या सदस्यांना उद्देशून हे वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता वाद सुरू झाला आहे.
हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलक शेतकऱ्यांबाबत खळबळजनक वक्तव्य
मनोहर लाल खट्टर म्हणाले की, ५०० ते १००० हजार कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक भागात उभी करा. विशेषतः हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात परिस्थिती बिकट आहे. तिथे याची आवश्यकता अधिक आहे. आता जशास तसे उत्तर शेतकऱ्यांना द्या. लाठ्या उचला आणि तुम्ही एकदा लाठ्या उचलल्या की मग कोणाचीच पर्वा करू नका. त्यानंतर तुम्ही तुरुंगात एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने राहाल, ना तर मोठे नेते व्हाल. इतिहासात तुमची नावे कोरली जातील.
मा. खट्टर जी,
भाजपा समर्थक लोगों को आंदोलनकारी किसानों पर लट्ठों से हमला करने, जेल जाने और वहाँ से नेता बनकर निकलने का आपका ये गुरूमंत्र कभी कामयाब नहीं होगा।
संविधान की शपथ लेकर खुले कार्यक्रम में अराजकता फैलाने का ये आह्वान देशद्रोह है।
मोदी -नड्डा जी की भी सहमती लगती है। pic.twitter.com/ZArlrRZYyw
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 3, 2021
आता देशभरातून मनोहर लाल खट्टर यांच्या या खळबळजनक वक्तव्याबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याच पार्श्वभूमीवर, ट्विट करत खट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजप समर्थकांना आंदोलक शेतकऱ्यांवर लाठ्यांनी हल्ला करण्याचा, तुरुंगात जाण्याचा आणि त्यानंतर मोठा नेता होण्यासाठी मदत करण्याचा तुमचा हा गुरुमंत्र कधीही यशस्वी होणार नाही. संविधानाची शपथ घेऊन खुल्या कार्यक्रमात अराजकता पसरवण्याच्या या सूचना देशद्रोहच आहे. मोदी आणि नड्डाजी देखील याच्याशी सहमत असल्याचे दिसत आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे.