कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीच्या तपासात पुन्हा सापडले ड्रग्स; आणखी आठ जण ताब्यात


मुंबई – रविवारी पहाटेच्या सुमारास केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मोठी कारवाई केली. रविवारी दिवसभर या घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना या प्रकरणामध्ये एनसीबीने अटक केली. पुन्हा त्या क्रूझवर जाऊन एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरु केली आहे. यानंतर आता आणखी आणखी आठ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी मुंबईला परतलेल्या क्रूझची एनसीबीने झडती घेतल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणखी ड्रग्स जप्त केले असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रविवारच्या तपासानंतर एनसीबीचे हेच धाडसत्र सोमवारी पहाटेही सुरु होते. याच प्रकरणासंदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ पुरवणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत एनसीबीने वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतले. आता अमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अमली पदार्थ पुरवले जातात यासंदर्भातील पुरवठा साखळी आणि इतर महत्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.