लखीमपूर हिंसाचार : योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा


लखनऊ – लखीमपूर खेरी येथील आंदोलक शेतकऱ्यांशी उत्तर प्रदेश सरकारने संवाद साधला असून उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असून जखमींना १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच पीडितांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल, अशी घोषणा योगी सरकारने केली आहे.

याबाबत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखीमपूर खेरीमध्ये रविवारी मरण पावलेल्या ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकार ४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देईल. तर, जखमींना १० लाख रुपये दिले जातील. त्याचबरोबर या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार एफआयआर नोंदवला जाईल आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करतील. सध्या जिल्ह्यात कलम १४४ लागू असल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही. केवळ शेतकरी संघटनांचे नेते जिल्ह्यात येऊ शकतात.

एकूण नऊ जणांचा लखीमपूर हिंसाचारात मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, मारले गेलेले इतर चार जण हे भाजप कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर या घटनेत एका स्थानिक पत्रकाराचा देखील मृत्यू झाला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.