यामुळे थेट संयुक्त राष्ट्रांनाच उत्तर कोरियाने दिली धमकी


प्योंगप्यांग – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (यूएनएससी) आपल्या एका निवेदनाद्वारे उत्तर कोरियाने इशारा दिला आहे. उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित हा इशारा आहे. यूएनएससीची एक बैठक नुकतीच पार पडली. फ्रान्सने या बैठकीत निवेदनाचा मसुदा काही देशांसोबत शेअर केला आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमासंदर्भात यात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचे पूर्णपणे पालन करत उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यात यावी, असेही त्यात म्हणण्यात आले आहे. उत्तर कोरिया या प्रस्तावानंतर भडकला असून त्याने संयुक्त राष्ट्रांनाच इशारा दिला आहे.

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जो चोल सु यांनी इशारा दिला आहे, की उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नांचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला भविष्यात काय परिणाम होऊ शकतात, हे समजायला हवे. सरकारी माध्यमांनुसार, जो चोल सु यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवरही दुटप्पीपणाचा आरोप केला. अमेरिका आणि त्याचे मित्र जेव्हा अशाच शस्त्रांची चाचणी करतात, तेव्हा संयुक्त राष्ट्राला तो मुद्दा वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गुरुवारी उत्तर कोरियाने नुकत्याच केलेल्या चाचण्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलावली होती. जवळपास सहा महिने शांत राहिल्यानंतर उत्तर कोरियाने सप्टेंबरमध्ये पुन्हा नव्याने विकसित केलेल्या अण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली. किम जोंगने अमेरिकेबद्दल कठोर भूमिका स्वीकारली आहे. तो म्हणाला होता, अमेरिकेचा लष्करी धोका अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर आपण आपल्या देशात अण्वस्त्रे वाढविणे सुरूच ठेऊ आणि अमेरिका जोपर्यंत तिरस्काराचे धोरण बदलणार नाही, तोपर्यंत त्यांच्याशी बोलणी करणार नसल्याचेही किम जोंग म्हणाले होते.