भाजपशी फारकत घेणार वरुण गांधी?, ट्विटर इन्फोमधून ‘भाजप’ शब्द हटवला


नवी दिल्ली: आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचे नाव उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी यांनी काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी भाजप नेत्यांवर थेट हल्ला करत आहेत. त्यांनी आता त्यानंतर थेट ट्विटर अकाउंटवरून भाजपचे नाव हटवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून वरुण गांधी भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांनी पत्रही लिहिले आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. निर्दयपणे आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. गांधी जयंतीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. ज्या प्रकारे अन्नदात्यांची हत्या करण्यात आली, ती एखाद्या सभ्य समाजासाठी अक्षम्य आहे. आंदोलक शेतकरी आपले बांधव आहेत. काही मुद्द्यांवर आंदोलकांमध्ये रोष असेल आणि ते लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतील, तर त्यांच्याशी संयम आणि धैर्याने वागले पाहिजे, अशा शब्दात वरुण यांनी योगी सरकारला सुनावले आहे.


आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यासोबत चांगले वागले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून संवेदनशीलतेने सर्व मुद्दे हाताळले पाहिजे. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

वरुण गांधी यांनी योगी सरकारला खरमरीत पत्र लिहिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवल्यामुळे वेगवेगळे कयास वर्तवले जात आहेत. वरुण गांधी भाजप सोडणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. वरुण यांना मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. शिवाय भाजप पक्षातही त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते अडगळीत पडल्याची भावना त्यांना सतावत असावी. म्हणूनच ते भाजपवर नाराज असल्यानेच त्यांनी अकाउंटवरून भाजप हा शब्द हटवला असावा, असे राजकीय जाणकार सांगतात.