आजपासून बँक व्यवहाराशी निगडीत ‘हे’ महत्वाचे नियम बदलले


मुंबई : बँक व्यवहाराशी निगडीत अनेक नियम आज 1 ऑक्टोबरपासून बदलले आहेत. ग्राहकांच्या खिशावरही या बदलाचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, बँकेचे कोणते नियम बदलतील हे जाणून घेणे आपल्यापैकी अनेकांसाठी खूप महत्वाचे आहे. ग्राहकांना जर या नियमांची माहिती असेल तर त्यांना बँकेत कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे आजपासून नेमके कोणते नियम बदलले आहेत, याची माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत.

1 ऑक्टोबरपासून डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम बदलले आहेत. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्ती वेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते देशातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतील. मुख्य पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रदान केंद्रात वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागतील. ज्येष्ठांना या कामासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

ऑक्टोबरपासून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून वृद्धांसाठी लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याचे काम सुरू होईल. असे निर्देश भारतीय टपाल खात्याला देण्यात आले आहेत की, जर जीवनप्रदान केंद्राचा आयडी बंद असेल, तर तो वेळेत सक्रिय करा जेणेकरून वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड 1 ऑक्टोबरपासून आपोआप अवैध ठरतील. या तीन बँकांमध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. अलीकडेच या बँकांचे विलीनीकरण इतर बँकांमध्ये झाले आहे. विलीनीकरणामुळे खातेधारकांच्या खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झाला आहे. या कारणास्तव, 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुने चेकबुक नाकारेल.

1 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्डावरून ऑटो डेबिटसाठी नवीन लागू केले जात आहेत. या नियमानुसार, ऑटो डेबिट ग्राहकाने मंजुरी दिल्याशिवाय होणार नाही. 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, बँकेला कोणत्याही ऑटो डेबिट पेमेंटसाठी ग्राहकांना 24 तास अगोदर सूचना द्यावी लागेल. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कन्फर्म झाल्यावरच डेबिट केले जातील. ही अधिसूचना ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारेही पाठवली जाईल.