मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते यांच्या विरोधात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरु केलेली आरोपांची मालिका अद्यापही सुरुच आहे. पण यावेळी त्यांच्या रडारावर कुणी राजकीय नेता नाही, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आला आहे. त्यांनी मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केले आहे, महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून विश्वास नांगरे पाटील काम करत असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

राज्य सरकार घोटाळ्यांच्या प्रकरणाच्या तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. मुंबई पोलिसांनी हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटले की, ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लक्षात घ्यावे. मला विश्वास नांगरे पाटलांनी तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवले. तेच सर्व सूचना देत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ज्या पद्धतीने मला कोल्हापूरला जाताना रोखले त्याविरोधात किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी पंधराशे कोटी रुपयांचे कंत्राट दादागिरी करून स्वतःच्या लोकांना दिले. कायद्याची तरतूद नसतानाही स्वतःच्या जावयाला असे कंत्राट दिले. ग्रामपंचायतीचा खर्च कमी आणि त्यांना वर्षाला 50 हजार रुपये असे कंपनीला द्यावे लागणार आहेत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार आहे. हे सगळे काम अँटिकरप्शने करायला पाहिजे होते, पण यांनी अँटिकरप्शनलाच करप्ट केले आहे. या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार अडथळे निर्माण करत आहे म्हणून आम्हाला केंद्राकडे जावे लागते, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.