कोल्हापूर : उपचारांचा खर्च परवडत नसल्यामुळे ५ वर्षांच्या चिमुकल्याला पित्याने नदीत फेकले


कोल्हापूर – मुलावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आपल्या पोटच्या मुलाला पित्यानेच नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना कोल्हारपूरमध्ये घडली आहे. ही घटना कोल्हापूरच्या इचलकरंजी भागात उघडकीस आली असून पोलिसांनी या प्रकरणी पित्याला अटक केली आहे. ४८ वर्षीय पित्याचे नाव सिकंदर हुसेन मुल्ला असे असून नदीत फेकलेल्या ५ वर्षांच्या चिमुकल्याचे अफान सिकंदर मुल्ला असे नाव आहे. शिवाजी नगर पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला सिकंदरने पंचगंगा नदीत फेकल्याची माहिती दिली असून त्यानुसार मुलाचा शोध घेतला जात आहे.

फिट्स येण्याचा आजार पाच वर्षांच्या अफानला आहे. सिकंदर हा मोलमजुरीचे काम करतो. शिवाय सिकंदर स्वत: दिव्यांग आहे. त्याच्या कुटुंबात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. त्यातच दारूच्या नशेत, तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. त्याला एक दहा वर्षांची मुलगी आणि अफान अशी दोन मुले आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरून त्यांच्या घरी सतत वाद होत होते.

दरम्यान, सिकंदर गेल्या दोन दिवसांपासून घराबाहेर होता. त्यामुळे घरी परतताच त्याच्या पत्नीने त्याला चांगलेच सुनावले. तसेच, अफानच्या औषधोपचारांवरून देखील त्यांच्यात वाद झाला. त्याच्या इतर कुटुंबीयांनी देखील त्याला सुनावले. त्यामुळे सिकंदरला संताप अनावर झाला. संध्याकाळी संतापाच्या भरात मुलाला उपचारांसाठी नेतो असे सांगून सिकंदर ५ वर्षांच्या अफानला घेऊन गेला. पण रात्री उशिरा घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे कुटुंबियांना सांगितले. हे ऐकून सिकंदरच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. या प्रकारानंतर सिकंदरची शिवाजी नगर पोलिसात तक्रार करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.