चिंताजनक बाब ! पुण्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त!


पुणे – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र मागील अनेक दिवसांपासून येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून देखील शाळा, मंदिरे पुन्हा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, दुसरीकडे राज्यातील लसीकरण मोहिमेने देखील हळूहळू वेग घेतला असल्यामुळे व्यापक प्रमाणावर नागरिकांना लसीकृत केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे पुण्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण काहीसे वाढले असल्यामुळे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पुण्यात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे पहिल्या डोसनंतर कोरोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. पुणे शहरात कोरोनाबाधित होण्याचा दर २.१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये २.२ टक्के आणि पुणे ग्रामीणमध्ये ३.८ टक्के आहे. गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्यूदर देखील काहीसा कमी झाला आहे.

मागील आठवड्यात ५ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात ५ टक्के वाढ झाली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होत आहे, याचा सर्वे केल्यानंतर त्यात ०.१९ टक्के लोकांना बाधा होत असल्याचे लक्षात आले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ०.२५ टक्के एवढे असल्याचे अजित पवार म्हणाले. गेल्या १५ दिवसांत पुण्यात रोजच्या रुग्णांमध्ये ३० टक्के आणि अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १९ टक्के घट दिसून आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाची लागण दुसऱ्या डोसनंतर देखील होण्याचे प्रमाण जास्त का आहे, याविषयी देखील पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही हे प्रमाण जास्त का याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की दुसरा डोस झाल्यानंतर लोक नियम फारसे पाळत नाहीत. मास्क न घालणे, इतर नियमावलीचे पालन न करणे हे घडत असल्यामुळे जरी आपण टप्प्याटप्प्याने शिथिलता आणत असलो, तरी नागरिकांनी मास्क वापरलेच पाहिजेत. सामाजिक अंतर पाळलेच पाहिजे. स्वत:सोबत आपल्या परिवाराचीही काळजी घ्यायला हवी, असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

दरम्यान अजित पवारांनी यावेळी पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सलग ७५ तास लसीकरण केले जाणार असल्याची माहिती दिली. पुण्यात सलग ३ दिवस आणि पुढे तीन तास असे सलग ७५ तास शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाचा कार्यक्रम घेतला जाईल, असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यात एक कोविड आणि इतर नॉन कोविड रुग्णालये सुरू करावीत असे सांगितले आहे. कोरोनाबाबत शाळांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मुले त्यासंदर्भातील काळजी घेतील, असे देखील अजित पवार म्हणाले.